ट्विटरकडून भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या खात्यावरील हटवलेली ‘ब्लू टिक’ पुन्हा बहाल !

  • सरसंघचालकांसह अन्य संघ नेत्यांच्या खात्यांवरील ब्लू टिक गायब !

  • भारत सरकार ट्विटरवर कारवाई करण्याच्या पवित्र्यात !

ज्या प्रमाणे विरोधानंतर ट्विटरकडून ‘ब्लू टिक’ बहाल केली जाते, तसेच हिंदूंच्या संघटनांची फेसबूक पाने बंद करणार्‍या फेसबूकच्या विरोधातही हिंदूंनी आवाज उठवून त्यांच्यावर दबाव निर्माण करून ती पाने पुन्हा चालू करण्यास फेसबूकला बाध्य केले पाहिजे ! तसेच सरकारनेही याकडे गांभीर्याने पहात फेसबूकला खडसावले पाहिजे !

नवी देहली – विदेशी सामाजिक माध्यम ट्विटरकडून भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर खात्यावरील ‘ब्लू टिक’ काढण्यात आली होती. त्याला विरोध झाल्यानंतर ती पुन्हा दिसू लागली आहे. याविषयी ‘ट्विटर इंडिया’ने स्पष्टीकरण देतांना म्हटले की, दीर्घकाळापासून हे खाते लॉग इन झाले नव्हते; म्हणून त्यावरील ‘ब्लू टिक’ गायब झाली होती.’ व्यंकय्या नायडू यांचे ट्विटर खाते जुलै २०२० पासून कार्यरत नव्हते. कोणत्याही सूचनेविना उपराष्ट्रपतींच्या खात्यावरून ब्लू टिक कशी हटवण्यात आली ? याविषयी सूचना प्रसारण मंत्रालयाकडून ट्विटरला नोटिसीद्वारे जाबही विचारला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘हा भारताच्या एका घटनात्मक पदाचा अपमान आहे’, असे भारत सरकारचे म्हणणे असल्याचेही सांगण्यात येत आहे.

सरसंचाचालकांसह काही संघनेत्यांच्या खात्यांवरील ब्लू टिक हटवली !

ट्विटरने राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील अनेक मोठ्या नेत्यांच्या वैयक्तिक खात्यांवरूनही ‘ब्लू टिक’ हटवली आहे. यामध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, अरुण कुमार, भैयाजी जोशी आणि सुरेश सोनी यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे.

‘ब्लू टिक’ म्हणजे काय ?

‘ब्लू टिक’ कोणत्याही ट्विटर खात्याची सत्यता दर्शवत असते. म्हणजेच, महत्त्वाच्या व्यक्तीचे ते अधिकृत खाते असल्याचे ही टिक दर्शवत असते.