‘मुंबई सागा’ या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांना कायदेशीर नोटीस !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती केल्याचे प्रकरण

संघ स्वयंसेवकांच्या प्रतिमेवर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न

मुंबई – ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वर प्रदर्शित झालेल्या ‘मुंबई सागा’ या चित्रपटामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबईतील कार्यकर्ते श्री. महेश भिंगार्डे यांनी ३१ मे या दिवशी या चित्रपटाचे लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक यांना अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांच्याद्वारे नोटीस पाठवली आहे. संघाची मानहानी करणारा संवाद चित्रपटातून काढावेत, अशी मागणी या नोटिसीद्वारे करण्यात आली आहे.

चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक संजय गुप्ता, निर्माता कृष्णकुमार, अनुराधा गुप्ता, संगीता अहीर, चित्रपटाची निर्मिती करणार्‍या ‘सुपर कॅसेट इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार दुआ, तसेच संस्थेचे अन्य अधिकारी, ‘व्हाईट फेदर फिल्म्स’चे हनीफ अब्दुल रझाक चुनावाला अशा अनेकांना नोटीस पाठवण्यात आली आहे. ‘मुंबई सागा’ या चित्रपटातील अभिनेत्याच्या तोंडी असलेल्या संवादामध्ये ‘भाऊच्या संघटनेचा सदस्य’ असा उल्लेख करण्यात आला आहे. या संघटनेचे सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे संघाचा गणवेश, हातात लाठी, तसेच शाखेत ध्वजाला प्रमाण करतांना दाखवण्यात आले आहेत. ‘अनेक स्वयंसेवक पोलीस खात्यात जातात आणि नंतर भ्रष्टाचार करतात’, असा संवादही या चित्रपटामध्ये आहे.

याविषयी श्री. भिंगार्डे यांनी म्हटले आहे की, मी स्वतः संघाचा स्वयंसेवक आहे. संघाची संपत्ती म्हणजे त्यांचे ‘स्वयंसेवक’ ! या चित्रपटातील दृश्ये आणि संवाद केवळ संघाच्याच नव्हे, तर माझ्यासारख्या सामान्य स्वयंसेवकाच्या प्रतिमेवरही शिंतोडे उडवले गेले आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर

‘मुंबई सागा’ या चित्रपटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील स्वयंसेवकांचे दृश्य दाखवले आहे. यातून संघाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून येतो. ‘ही नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत संबंधित प्रसंग आणि संवाद चित्रपटातून काढावेत, तसेच अपकीर्ती केल्याविषयी क्षमायाचना करावी आणि त्याला प्रसारमाध्यमांतून व्यापक प्रसिद्धी द्यावी’, अशा आमच्या मागण्यात आहेत.