चीनकडून गलवान खोर्‍यातील चिनी सैनिकांच्या मृत्यूच्या संख्येवर संशय घेणार्‍या ब्लॉगरला अटक

चीनने त्याच्या सैनिकांच्या मृत्यूची संख्या कितीही दडपली, तरी सत्य जगाला ठाऊक आहे, हे त्याने लक्षात ठेवावे !

बीजिंग (चीन) – गेल्या वर्षी लडाखच्या गलवान खोर्‍यात भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षातील चीनच्या मृत झालेल्या सैनिकांच्या संख्येविषयी संशय व्यक्त करणार्‍या एका ब्लॉगरला चीनने अटक केली आहे. त्याला ८ मासांची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. चाऊ जिमिंग असे या ब्लॉगरचे नाव असून त्यांच्यावर ‘हुतात्म्यांचा अवमान’ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चाऊ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले होते, ‘भारतीय सैनिकांना चीनचे सैनिक घाबरले होते आणि ते त्यांचा सामना करण्यास सिद्ध नव्हते.’ या संघर्षात चीनच्या केवळ ४ सैनिकांचा मृत्यू झाल्याचे चीनने अधिकृतरित्या घोषित केले आहे; मात्र यात ४५ हून चिनी सैनिक ठार झाल्याचा दावा काही विदेशी माध्यमांनी केला आहे.