हा आस्थापनाचा मनमानी कारभार आहे कि महापालिकेतील कुणा अधिकार्यांचा पाठिंबा आहे ? हेही शोधले पाहिजे !
हडपसर – वानवडी येथील शिवरकर रस्त्यावर महापालिकेच्या रस्त्याचे अनुमतीविना खोदकाम केल्याप्रकरणी वाकड येथील मे. विक्रम टेलेईफ्रा प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनावर गुन्हा नोंद केला आहे. महापालिकेच्या पथ विभागाच्या कनिष्ठ अभियंत्या गौरी नंदे यांनी याविषयी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या आस्थापनाने २०० मीटर खोदकाम करण्याची अनुमती घेतली होती. त्यासाठी त्यांनी २० लाख ३१ सहस्र रुपये महापालिकेला भरले होते, मात्र प्रत्यक्षात ७१५ मीटरच्या रस्त्याचे अनधिकृतपणे खोदकाम करून महापालिकेच्या सार्वजनिक मालमत्तेची हानी केली आहे. (याची भरपाई संबंधित आस्थापनाकडून त्वरित करून घ्यावी आणि त्यांना काळ्या सूचीत घालावे, असेच नागरिकांना वाटते ! – संपादक) याची पहाणी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपअभियंता सुनील कदम आणि कनिष्ठ अभियंता गौरी नंदे यांनी केल्यानंतर हे समोर आले. आस्थापनांवर सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून वानवडी पोलीस पुढील तपास करत आहेत.