शरद पवार यांच्या घराची सुरक्षा वाढविली !

उजनीचा पाणीप्रश्न पेटला !

उजनी धरण

पुणे – उजनीतील ५ टी.एम्.सी. पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला होता. मात्र करमाळा, माढा, मोहोळ आदी तालुक्यांतील शेतकरी या निर्णयामुळे संतप्त झाले होते. उजनी धरणातील ५ टी.एम्.सी. पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा निर्णय सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि नेतेमंडळींच्या रेट्यामुळे मागे घेतल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जाहीर केले होते, मात्र तसा कोणताही शासकीय आदेश अद्याप निघालेला नाही. पाणी देण्याचा निर्णय रहित झाल्याने इंदापूर मधील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी पाण्यासाठी इंदापूर तालुक्यात आंदोलने चालू केली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानासमोर आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे गोविंदबागे समोरील बंदोबस्त कायम ठेवून पोलिसांनी २ शेतकर्‍यांना तेथे पोचण्यापूर्वीच कह्यात घेतले.