केंद्र सरकारच्या शेतकरी, शेतमजूर, कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी राज्यात नगरसह अनेक जिल्ह्यांत निषेध आंदोलन !

नगर – केंद्र सरकारच्या शेतकरी, शेतमजूर आणि कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी २६ मे या दिवशी संयुक्त किसान मोर्चा, किसान सभा, शेतमजूर आणि कामगार संघटना यांच्या वतीने देशभर काळा दिवस पाळण्यात आला. यामध्ये नगर जिल्ह्यातील शेतकरी आणि कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शेतकर्‍यांनी घरे, गाड्या आणि ट्रॅक्टर यांवर काळे झेंडे लावून निदर्शने केली.

हमी भावाची तरतूद करा, चारही कामगार संहिता मागे घ्या, जी.एस्.टी. मुक्त करा, डिझेल पेट्रोल भाव वाढ मागे घ्या, स्वामीनाथन् आयोगाची कार्यवाही करा, सर्वांना विनामूल्य लस द्या, अशा अनेक मागण्यांसाठी हा निषेध दिवस पाळण्यात आला. देहलीतील शेतकरी आंदोलनाला साथ देण्यासाठी आपल्या घरावर काळे झेंडे फडकावत मोदी सरकारच्या कामगार आणि शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्याचे आवाहन विविध संघटनांच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार हे आंदोलन झाले.