सिंधुदुर्ग – जिल्ह्यातून मुंबई येथे रुग्ण नेण्यासाठी मागवलेली रुग्णवाहिका आवश्यक त्या सोयीसुविधा नसल्याने रुग्णाच्या नातेवाइकांनी परत पाठवली. याचा राग धरून रुग्णवाहिकेचा मालक विशाल जाधव याने रुग्णाच्या नातेवाईकाला ‘तुमचा रुग्ण तडफडेल; मात्र एकही रुग्णवाहिका मिळणार नाही’, असे उद्धटपणे बोलत धमकी दिल्याची घटना घडली. या घटनेचे वृत्त, तसेच रुग्णवाहिकेच्या मालकाने रुग्णाच्या नातेवाइकाशी केलेले असभ्य संभाषण सामाजिक माध्यमातून प्रसारित होताच जिल्ह्यात संताप व्यक्त होऊ लागला. मनसेने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि आर्.टी.ओ. यांच्याकडे जाधव याच्यावर कारवाईची मागणी केली. अखेर सिंंधुदुर्गनगरी पोलिसांनी जाधव याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.