सावंतवाडीत आजपासून गृहअलगीकरण बंद

  • सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची माहिती

  • स्वॅब तपासणी केलेले फिरतांना दिसल्यास १० सहस्र रुपये दंड

  • कोरानाबाधितांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवणार

राजाराम म्हात्रे

सावंतवाडी – कोरोनाबाधित रुग्णाला गृहअलगीकरणात ठेवल्यानंतर त्याचे नातेवाईक सर्वत्र फिरतांना दिसतात. त्यामुळे तालुक्यात कारोनाचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील गृहअलगीकरण २७ मेपासून बंद करण्यात येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील १० शाळा कह्यात घेण्यात येणार असून कोरोनाबाधित रुग्णांना १४ दिवस या शाळांमध्ये अलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. काहीही करून १० दिवसांत तालुक्यातील कोरोनाचा वाढलेला संसर्ग घटवायचा आहे, असा निर्धार तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केला आहे. स्वॅब तपासणीसाठी येणारे नागरिक बाहेर फिरतांना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून १० सहस्र रुपये दंड ठोठावण्यात येईल अथवा घरावर बोजा चढवण्यात येईल, अशी चेतावणी म्हात्रे यांनी दिली. (जनतेला शिस्त नसल्याने अशी कडक भूमिका घेतल्यासच रुग्णसंख्या घटेल ! – संपादक)

तालुक्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तहसीलदार म्हात्रे यांनी तालुक्यातील सरपंचांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांना तहसीलदार म्हात्रे यांनी ही माहिती दिली.