‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
एका शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या असंवेदनशील कारभारामुळे एका साधकाच्या कोरोनाबाधित नातेवाइकाचा मृत्यू होणे !
हे प्रशासनाला लज्जास्पद !
माझ्या काकांचे निधन झाल्यानंतर १५ दिवसांनी त्यांच्या मोठ्या सुनेला आणि तिसर्या क्रमांकाच्या सुनेला थोडा त्रास जाणवू लागला. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर आमच्या भागातील ओळखीच्या आधुनिक वैद्यांकडे उपचार चालू केले. ६ दिवस व्यवस्थित उपचार घेतल्यावर ओळखीचे आधुनिक वैद्य म्हणाले की, थोड्या प्रमाणात लक्षणे दिसत आहेत; पण आता बरे आहे. १५ दिवस औषधे घ्या, पूर्ण बरे व्हाल. नंतर लहान सुनेला बाहेरगावी उपचारासाठी पाठवून दिले. त्यानंतर ३ दिवसांनी मोठ्या सुनेच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे त्यांना त्या रहात असलेल्या शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये भरती केले. तेथे त्यांच्यावर २ दिवस उपचार करूनही फरक पडला नाही. त्यांची कोरोना चाचणी ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) आल्यामुळे तेथील डॉक्टरांनी मोठ्या सुनेला एका खासगी रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला.
रुग्णाला रुग्णालयात भरती केल्यावर आधुनिक वैद्यांनी नातेवाइकांनाच ‘रेमडेसिविर’ इंजेक्शन आणायला सांगणे आणि दायित्वशून्यपणे बोलणे
मोठ्या सुनेला म्हणजे माझ्या वहिनीला त्या खासगी रुग्णालयात भरती केले. तेव्हा मी आणि वहिनी रिक्शाने ‘सिटी स्कॅन’ करायला गेलो. त्या वेळी वहिनी चांगल्या होत्या. ‘सिटी स्कॅन’ करून परत आल्यावर वहिनींना पुन्हा अतीदक्षता कक्षात भरती करून घेतले. दुपारी तेथील आधुनिक वैद्यांनी ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनची व्यवस्था करा’, असा निरोप दिला. स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या वृत्तानुसार ‘रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविर आणायला लावू नये’, अशी जिल्हाधिकार्यांची बातमी प्रसिद्ध झाली होती. मी ही बातमी आधुनिक वैद्यांना सांगितली आणि ‘रेमडेसिविर आम्ही कुठून आणू ?’, असे सांगून समजवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांनी आम्हाला ‘शासनाकडून मिळत नाही, तर कुठून देणार ? आम्ही काहीही करू शकत नाही’, असे उत्तर दिले. (असे आधुनिक वैद्य रुग्णांची किती काळजी घेत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक)
नियमानुसार रुग्णालयाने सरकारकडे ‘मेल’ करून इंजेक्शनची मागणी न करणे, रुग्णाच्या नातेवाइकांनी प्रयत्न करून इंजेक्शन मिळवणे आणि प्रशासनाने इंजेक्शन पाठवूनही आधुनिक वैद्यांनी ते रुग्णाला दिल्याचे खोटे सांगणे
खरेतर नियमानुसार रुग्णालयाने सरकारकडे ‘मेल’ करून इंजेक्शनची मागणी करणे क्रमप्राप्त होते. रुग्णालयाने ‘आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला ‘मेल’ केला आहे; पण आम्हाला आलेच नाही’, असे खोटेच सांगितले. मी तात्काळ एका माहिती अधिकार्यांना संपर्क करून अडचण कळवली. आम्ही लगेच जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन चौकशी केली. तेव्हा तेथील कर्मचार्यांनी ‘त्या खासगी रुग्णालयाने आज रेमडेसिविरची कोणतीही मागणी केलेली नाही’, असे सांगितले. तेथील तपशीलाचे मी छायाचित्र काढून घेतले.
यानंतर मी तेथील अधिकार्यांना विनवणी करून रुग्णालयाला रेमडेसिविरचा पुरवठा करण्याची विनंती केली. त्यांनी ‘आज सायंकाळपर्यंत त्या खासगी रुग्णालयाला ५ रेमडेसिविर पाठवू’, असे सांगितले आणि पाठवलेही. रात्री रुग्णालयात रेमडेसिविर मिळाल्याविषयी चौकशी केली. तेव्हा त्यांनी ‘तुमच्या रुग्णाला रेमडेसिविर इंजेक्शन दिले आहे’, असे सांगितले; पण प्रत्यक्षात त्यांना इंजेक्शन दिले नव्हते. आदल्या दिवशी रात्री भरती केलेल्या रुग्णाला दुसर्या दिवसाच्या रात्रीपर्यंत आम्ही पाहिलेही नव्हते. त्यांना रुग्णालयाने जेवणही दिले नव्हते आणि आम्हाला भेटूही दिले जात नव्हते.
रुग्णाच्या नातेवाइकांनी आधुनिक वैद्यांना इंजेक्शन देण्याची आठवण करून दिल्यावर त्यांनी दिलेले निर्लज्जपणाचे उत्तर !
दुसर्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा तेथील डॉक्टरांना इंजेक्शन देण्याची आठवण केली. तेव्हा त्यांनी निर्लज्जपणे सांगितले की, आमच्याकडे २५ रुग्ण आहेत आणि केवळ ५ इंजेक्शन आले. कोणकोणत्या रुग्णाला देणार ? जा आणि प्रयत्न करा अन् इंजेक्शन आणून द्या. तेव्हा आम्ही पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. तेव्हा नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकार्याने ‘आम्ही त्या खासगी रुग्णालयाला १० डोस पाठवले आहेत आणि पुन्हा पाठवत आहोत’, असे सांगितले. तरीही त्या रुग्णालयाला कोणतीही दया आली नाही.
रुग्णालयाने रुग्णाची योग्य प्रकारे काळजी न घेतल्याने त्याची प्रकृती खालावणे
दुपारी २ वाजता रुग्णाने त्यांच्या पतीला दूरभाष करून सांगितले की, माझे काही खरे वाटत नाही. श्वास घेण्यास त्रास होत आहे. हे लोक मला फुगे फुगवायला देत आहेत. (हे एक यंत्र आहे जे हृदयविकाराच्या रुग्णाला दिले जाते. ज्यात एक नळी असते. तिला फुंकले की, ३ चेंडू वर खाली होतात.) आम्ही ही गोष्ट रुग्णालयाच्या लक्षात आणून दिली. तेव्हा त्यांनी रुग्णाला ऑक्सिजन लावला. त्या वेळी आमच्या मनात विचार आला की, ‘कोरोना स्कोर १४’ येऊनही रुग्णालयाने काय उपचार केले ?
आम्हाला पुष्कळ काळजी वाटायला लागली. याविषयी आम्ही एका परिचयाच्या डॉक्टरांना सांगितले. त्यांनी स्वत: रुग्णालयामध्ये जाऊन रुग्णाची स्थिती पाहिली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आमच्या रुग्णाची प्रकृती खालावत चालली आहे. त्यांनी आम्हाला लवकर काहीतरी करण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘‘येथे ज्यांची काही पात्रता नाही, अशा ४-५ जणांनी मिळून कोविड केअर सेंटर चालू केले आहे.’’
बनावट (खोट्या) डॉक्टरांनी कोविड केअर सेंटर चालवून रुग्णांच्या जीविताशी खेळणे
आम्ही रुग्ण भरती असलेल्या खासगी रुग्णालयाचा हलगर्जीपणा आमच्या परिचित डॉक्टरांना सांगितला आणि त्यांना ‘रुग्णालयातील डॉक्टरांशी बोलून बघता का ?’ असे विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले की, मुळात रुग्णालयात बसलेले डॉक्टर नाहीतच. ते १५ वर्षांचा अनुभव असलेले कंपाऊंडर आहेत. हे ऐकून आम्हाला धक्का बसला. सगळीकडे दवाखाने भरलेले होते. आता इतरत्र आपला रुग्ण हालवला, तर काय होईल ? या भीतीपोटी आणि योग्य उपचार कुठे घेता येतील ? याचा शोध घेत असल्यामुळे आम्ही दुसरे रुग्णालय मिळेपर्यंत आमच्या रुग्णाला तेथेच ठेवले.
ओळखीच्या डॉक्टरांच्या साहाय्याने रुग्णाला अन्य रुग्णालयात स्थलांतरित करणे आणि नंतर रुग्णाची अत्यवस्थ स्थिती होणे
त्यानंतर आम्ही परत आमच्या ओळखीच्या आधुनिक वैद्यांचे साहाय्य घेतले. त्यांच्या साहाय्याने आम्ही रहात असलेल्या शहरात योग्य रुग्णालय मिळाले. त्यानंतर आम्ही त्या रुग्णालयाला आमच्या रुग्णाचे वैद्यकीय अहवाल पाठवले. ते पाहून येथील डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णाची स्थिती अतिशय धोकादायक आहे; पण आपण प्रयत्न करू. त्यानंतर रुग्णाला रात्री १० वाजता या रुग्णालयात हालवले. रुग्णाला पाहून डॉक्टरांनी २ रेमडेसिविर इंजेक्शन आणायला सांगितले. आम्हाला एक इंजेक्शन मिळाल्यावर ते दिले; पण त्याचा काहीच फरक पडला नाही. सकाळपर्यंत रुग्ण अत्यवस्थ स्थितीत गेला.
रेमडेसिविर आणि अन्य इंजेक्शन्स् काळ्याबाजारात प्रचंड रकमेत विकली जाणे आणि काळाबाजार चालू असलेले ठिकाण पोलीस ठाण्याच्या जवळ असूनही कोणतीही कारवाई केली न जाणे
सकाळी रुग्णाचे पुन्हा रक्ताचे नमुने घेतले. त्याचे अहवाल दुपारी ३ वाजता आले. त्याप्रमाणे कोरोना स्कोर न्यून न झाल्यामुळे रक्ताचे घट्ट होण्याचे प्रमाण ५ सहस्र पटीने वाढले होते. त्यावर शेवटचा एकमात्र उपाय म्हणजे ‘टोसिन’ नावाचे इंजेक्शन देणे हा होता. त्याचे मूल्य ४० सहस्र होते. अहवाल आल्यावर हे इंजेक्शन २ घंट्यांच्या आत, म्हणजे साधारण सायंकाळी ५ वाजेपर्यंत देणे आवश्यक होते. आम्ही अनुमाने ५ ते ६ जिल्ह्यांमध्ये ‘टोसिन’ इंजेक्शनचा शोध घेतला. मध्यप्रदेश येथेही चौकशी केली; पण कुठेच हे इंजेक्शन मिळाले नाही. या इंजेक्शनसाठी आम्ही अडीच लाख रुपये देण्याची सिद्धता ठेवूनही ते आम्हाला मिळाले नाही. आम्ही रहात असलेल्या शहरात शोध घेत असतांना रुग्णालयाच्या बाहेर एक अल्पसंख्यांक व्यक्ती, काही धर्मांधांसह दलालही फिरत होते. आम्ही त्यांना ‘टोसिन’विषयी विचारले. तेव्हा त्यांनी त्याचे मूल्य सांगून ‘उद्या देतो’, असे सांगितले; पण आम्हाला ते इंजेक्शन आजच हवे होते. मग आम्ही त्या व्यक्तींना रेमडेसिविर इंजेक्शनविषयी विचारले, तर त्यांच्याकडे ते २५ सहस्र रुपयांना मिळत होते. आम्हाला त्याची आवश्यकता नसल्यामुळे आम्ही ते घेतले नाही. या रुग्णालयाच्या हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे. असे असतांनाही औषधांचा खुला काळाबाजार चालू होता.
सर्व प्रकारे प्रयत्न करूनही इंजेक्शन न मिळणे आणि रुग्णाचे निधन होणे
आमची शेवटची वेळ निघून गेली होती. आता रात्रीचे ८ वाजून गेले होते. शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही टोसिन इंजेक्शन शोधत होतो. पैसे हातात असूनही वेळेवर एकही इंजेक्शन मिळाले नाही. शेवटी रात्री १२ वाजता आमच्या रुग्णाचे निधन झाले.
या स्थितीला उत्तरदायी कोण ?
१. सुदृढ रुग्ण मरणावस्थेत येईपर्यंत सरकारी यंत्रणेकडून इंजेक्शने मिळत नाहीत; पण दलालांना मिळतात. इंजेक्शनचा काळाबाजार चालू असल्याची कल्पना जवळच्या पोलीस ठाण्याला नसावी, याचे आश्चर्य वाटते. रेमडेसिविर जेव्हा औषधांच्या दुकानात विक्रीला होते, तेव्हा १ ते ५ सहस्र रुपयापर्यंत मिळत होते. सरकारने ते कह्यात घेताच त्याचा तुटवडा कसा निर्माण झाला ? त्याचे दर २५ ते ५० सहस्रांपर्यंत कुणी आणले ? सरकारकडून मिळालेली इंजेक्शने रुग्णालय प्रशासन रुग्णाला न देता दलालांपर्यंत पोचते करतात. रुग्णाला २३ किलोमीटर अंतरावरून आणावयाचे झाल्यास रुग्णवाहिका चालक ३ सहस्र रुपये घेतात.
२. सध्या ठिकठिकाणी खासगी कोविड केअर सेंटर उभे रहात आहेत. ते कुणालाही २ ते ३ कोटी रुपये वाटप करून मिळते. त्यासाठी पात्रता लागत नाही, असे वाटल्यास चुकीचे ते काय ?
‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. असे अनुभव प्रत्येकाचे असतीलच, असे नाही. तसेच यामध्ये अफवा पसरवण्याचा हेतू नाही. जनतेसमोर हे अनुभव छापण्यामागे ते प्रशासनापर्यंत पोचून त्यावर कार्यवाही व्हावी, हा उद्देश आहे. हा लेख छापण्यामागे कुणाची मानहानी करण्याचा उद्देश नाही, तर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी अन् जनतेला दिलासा मिळावा, हा उद्देश आहे.’ – संपादक |
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !आरोग्य साहाय्य समितीपत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : [email protected] |
हा लेख लिहून होईपर्यंत त्या खासगी रुग्णालयावर कारवाई झाली; पण अजूनही ते रुग्णालय चालू आहे. ज्या रुग्णालयाबाहेर दलाल असायचे, त्या १२ दलालांना अटक झाली; पण त्यातील २ मुख्य डॉक्टर्स पसार आहेत. त्यांचे रुग्णालय अद्यापही चालू आहे. रुग्णालयातून औषधे विक्री करणार्या दुकानाकडे इंजेक्शने आणून देणार्या दुकानावर कारवाई झाली; पण ते दुकान आणि रुग्णालय अजूनही चालू आहे. (प्रशासनाची वरवरची कारवाई ! अशी कारवाई करून काळाबाजार करणारे आणि रुग्णाच्या जीविताशी खेळणारी रुग्णालये यांना कधी कायद्याचा धाक वाटेल का ? आरोग्य यंत्रणेची दुःस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक ! – संपादक) – एक साधक |