माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील ३ निकटवर्तियांच्या घरी ‘ईडी’ची धाड ! 

१०० कोटी रुपयांचे वसुलीचे प्रकरण

नागपूर – १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने) गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर ‘ईडी’ने देशमुख यांच्या ३ निकटवर्तियांच्या घरावर धाड टाकून झडती चालू केली आहे. शहरातील शिवाजीनगरमधील सागर भटेवरा, सदर येथील सुमित ‘आयझॅक’ यांच्यासह जाफरनगरमधील आणखी एका ठिकाणी ‘ईडी’च्या पथकाकडून झाडाझडती चालू आहे.

१. भटेवरा आणि ‘आयझॅक’ हे अनिल देशमुख यांचे निकटवर्तीय अन् व्यावसायिक भागीदार मानले जातात. ‘ईडी’चे पथक या संदर्भातील कागदपत्रे पडताळत आहे.

२. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआयने) या विरोधात प्राथमिक अन्वेषण करून त्या आधारावर २१ एप्रिल या दिवशी ‘सीबीआय’च्या देहली येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. यात अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने ‘सीबीआय’ने यापूर्वी मुंबई आणि नागपूर येथील त्यांचे निवासस्थान तसेच कार्यालय यांवर धाड टाकली होती.

३. ‘सीबीआय’ने या अन्वेषणात ‘मनी लॉन्ड्रिंग’चीही शंका व्यक्त केली होती. त्याचा छडा लावण्यासाठी ‘सीबीआय’ने ही माहिती ‘ईडी’ला दिली. याच आधारावर या विरोधात गुन्हाही नोंद झाला होता.

अनिल देशमुख यांना या प्रकरणी लवकरच चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.