सांगली – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ५ मे या दिवशी सांगली जिल्ह्यात चालू झालेली कडक दळणवळणबंदी टप्प्याटप्याने २६ मेअखेर वाढवण्यात आली होती. यात परत एकदा १ जूनअखेर वाढ करण्यात आली आहे. किरकोळ किराणा दुकाने, भाजीपाला, बेकरी, फळ विक्रेते यांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत ग्राहकांना घरपोच सेवा देण्यास अनुमती देण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी निर्गमित केले आहे.
या आदेशात पुढे म्हटले आहे की, शेतीविषयी सेवा आणि शेती चालू रहाण्यासाठी बियाणे, खते, शेतीविषयक उपकरणे अन् त्यांची दुरुस्ती, देखभाल पुरवणार्या सेवा सकाळी ७ ते ११ पर्यंत चालू रहातील. या कालावधीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस वाहतूक सेवा जिल्ह्यांर्तगत पूर्णपणे बंद रहाणार आहे. २५ नागरिकांच्या उपस्थितीत २ घंट्यांच्या कालावधीत विवाह समारंभ करण्यास अनुमती देण्यात आली आहे. अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.