सरकारच्या नव्या नियमांचे पालन करण्यास सिद्ध; मात्र काही सूत्रांवर चर्चा आवश्यक ! – फेसबूक

केंद्र सरकारने सामाजिक संकेतस्थळे आणि माध्यमे यांना नियमावलींचे पालन करण्यासाठी दिलेली ३ मासांची मुदत संपली !

भारतात व्यावसाय करतांना भारताच्या नियमावलींचे पालन न करणार्‍या आस्थापनांवर भारत सरकारने आता बंदी घातली पाहिजे !

नवी देहली – आम्ही माहिती आणि तंत्रज्ञान नियमांचे पालन करू, यात दुमत नाही; मात्र काही सूत्रांवर चर्चा करणे आवश्यकच आहे. त्यासाठी आम्ही सरकारसमोर आमचे म्हणणे मांडणार आहोत, अशी भूमिका ‘फेसबूक’ आस्थापनाने मांडली. केंद्र सरकारने ३ मासांपूर्वी फेसबूक, ट्विटर आणि इंस्टाग्राम यांसारख्या सामाजिक संकेतस्थळ आणि माध्यमे यांना नियमावलींचे पालन करण्याचा आदेश दिला होता. ही मुदत २५ मे या दिवशी संपली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर फेसबूक आस्थापनाने त्याचे म्हणणे स्पष्ट केले. ‘फेसबूक’ हे व्यासपीठ लोकांना स्वतंत्रपणे आणि सुरक्षितरित्या व्यक्त होता यावे, यासाठी कटीबद्ध आहे, असेही फेसबूकने सांगितले.

१. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अशा आस्थापनांना भारतात अनुपालन अधिकारी आणि नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यास सांगितले होते. त्याचसमवेत त्यांचे कार्यक्षेत्र भारतातच हवे, अशी अट ठेवली होती. तक्रारींचे समाधान, आक्षेपार्ह पोस्ट आणि मजकूर यांवर देखरेख, अनुपालन अहवाल आणि आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठीचे नियम घालून देण्यात आले आहेत; मात्र या आस्थापनांनी हे नियम अद्याप लागू केलेले नाहीत, असे सांगण्यात येत आहे.

२. नव्या नियमांनुसार एक समितीही सिद्ध केली जाणार आहे. या समितीत संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, गृह मंत्रालय, माहिती प्रसारण मंत्रालय, कायदा, माहिती आणि तंत्रज्ञान, तसेच महिला अन् बाल विकास या मंत्रालयांतील सदस्यांचा समावेश असणार आहे.