भुयारी गटार योजनेमुळे सातारा शहरातील मंगळवार पेठेतील रस्त्यांची चाळण

अग्निशमन बंबही व्यवस्थित धावू शकत नाही !

भुयारी गटारासाठी खोदून ठेवलेल्या चरीत रुतून बसलेला अग्निशमन बंब

सातारा, २४ मे (वार्ता.) – सातारा नगरपालिकेच्या वतीने ऐव पावसाळ्याच्या तोंडवर भुयारी गटार योजना शहरातील मंगळवार पेठेत राबवण्यात येत आहे. यासाठी मंगळवार पेठेतील सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून पेठेतील रस्त्याने अग्निशमन बंबही व्यवस्थित धावू शकत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

शहरातील पेठांतून सध्या नगरपालिकेच्या वतीने निर्जंतुकीकरण चालू आहे. पालिकेच्या अग्निशमन बंबांच्या माध्यमातून ही फवारणी चालू आहे; मात्र २४ मे या दिवशी सकाळी गवंडी अळी येथील भुयारी गटार योजनेसाठी खोदून ठेवलेल्या चरीमध्ये अग्निशमन बंबाचे चाक अडकून पडले. अनेक प्रयत्न करूनही खड्डयातून बाहेर निघाले नाही. त्यामुळे निर्जंतुकीकरण मोहीम काही वेळ थांबवावी लागली. शेवटी क्रेन बोलवून अग्निशमन बंब काढण्यात आला.

भुयारी गटार योजना असून अडचण नसून खोळंबा !

काही दिवसांतच पावसाळा चालू होत असून भुयारी गटार योजनेचे काम अपूर्ण राहिले, तर रस्त्यांची अवस्था फार वाईट होऊ शकते. त्यातच कोरोनामुळे रस्त्यावरून अ‍ॅब्युलन्स, रिक्षा वगैरे कोणतीही मोठी वाहने व्यवस्थित चालू शकत नाहीत. त्यामुळे भुयारी गटार योजना असून अडचण नसून खोळंबा, अशी अवस्था होऊ नये, असे स्थानिकांना वाटते.