राजधानी देहलीचे नाव पालटून ‘इंद्रप्रस्थ’ करा ! – भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची मागणी

  • इस्लामी, तसेच अन्य आक्रमक यांनी पालटलेली गावे आणि शहरे यांची नावे तशीच ठेवणे, हे गुलामगिरीचे लक्षण आहे. देहलीच नव्हे, तर देशातील प्रत्येक शहराचे प्राचीन नाव शोधून त्यानुसार ठेवायला हवे ! हिंदु राष्ट्रात असा पालट करण्यात येईल !
  • वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांच्यावर येऊ नये. सरकारने स्वतःहून असे पालट करणे हिंदूंना अपेक्षित आहे !
(उजवीकडे) खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – भारताची राजधानी देहलीचे नाव पालटून ‘इंद्रप्रस्थ’ ठेवण्यात यावे, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी ट्वीट करून केली आहे. यासाठी त्यांनी द्रौपदी ट्रस्टच्या डॉ. नीरा मिसरा यांनी केलेल्या संशोधनाचा हवाला दिला आहे.

‘इंद्रप्रस्थ’ नाव करेपर्यंत देशात वाद चालू रहाणार असल्याचे ऋषींनी सांगितल्याचा दावा !

डॉ. स्वामी यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, डॉ. नीरा मिसरा यांच्या संशोधनातून सापडलेली तथ्ये राजधानी देहलीचे पुन्हा नामकरण करण्यासाठी पुरेशी आहेत. तमिळनाडूतील एका महान ऋषींनी मला सांगितले की, जोपर्यंत देहलीचे नाव पालटून ‘इंद्रप्रस्थ’ केले जात नाही, तोपर्यंत देशामध्ये वाद चालू रहातील.

महाभारत, तसेच ब्रिटीश आणि मोगल यांच्या काळात इंद्रप्रस्थाचा उल्लेख !

डॉ. नीरा मिसरा यांनी त्यांच्या संशोधनामध्ये अनेक पुरावे गोळा केले आहेत, ज्याद्वारे देहलीचे पूर्वीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ होते. यात महाभारताचाही उल्लेख करण्यात आला आहे. तसेच वर्ष १९११ च्या इंग्रजांच्या अधिसूचनेमध्येही याचा उल्लेख आहे. ब्रिटीश, तसेच मोगल यांच्या शासन काळातील महसूल आणि अन्य नोंदीमध्ये देहलीचे नाव ‘इंद्रप्रस्थ’ असल्याचेही उल्लेख आहेत.