|
नागपूर – ‘कोरोनाच्या तिसर्या लाटेत लहान मुले सर्वाधिक प्रभावित होतील’, असा अंदाज असला, तरी ९० ते ९५ टक्के मुलांमध्ये कोरोनाची सौम्य, तसेच साधारण लक्षणे आढळून येतात. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये’, अशी दिलासादायक माहिती ‘इंडियन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक’चे माजी अध्यक्ष डॉ. बकुल पारेख यांनी येथे दिली. मोठ्यांपासून लहानांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे मोठ्यांनी लहानांना जपावे, असा उपदेशही त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की,
१. लहान मुलांवरील कोरोना उपचाराचा कृती आराखडा ठरवण्यासाठी स्थापन केलेल्या कृतीदलाने औषधोपचाराचा आराखडा सिद्ध केला आहे. येत्या २ दिवसांत कृतीदलाची बैठक आयोजित केली आहे.
२. तिसरी लाट येईलच, असे नाही; परंतु ती येईल असे गृहीत धरून आम्ही सिद्धता केली आहे.
३. क्वचितच लहान मुलांना मोठ्यांसारखा ‘न्यूमोनिया’ होतो. यासाठी ‘रेमडेसिविर’ वा ‘टोसिलिझुमॅब’सारखी औषधे क्वचितच लागतात. ‘तज्ञांच्या उपदेशाविना ती देऊ नयेत’, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. मोठ्यांना लागणारे प्रत्येक इंजेक्शन आणि औषधे लहान मुलांना लागत नाहीत. आवश्यकता आहे कि नाही ?, हे पडताळूनच लहानांना औषधे दिली जातील.
४. कृतीदलाचे सदस्य ख्यातनाम बालरोगतज्ञ डॉ. विजय येवले म्हणाले की, लहान मुलांमध्ये वेगळ्या प्रकारचा ‘मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी सिंड्रोम’ हा नवा आजार कोरोनानंतर साधारणत: १ मासानंतर दिसून येतो. ताप येणे, पुरळ येणे, डोळे आणि ओठ लाल होणे, दम लागणे, उलटी होणे ही त्याची लक्षणे आहेत. लहानांना संसर्ग होऊ नये, याची काळजी मोठ्यांनीही घ्यावी.