म्युकरमायकोसिसला ‘महामारी’ घोषित करण्याची केंद्रशासनाची सूचना !
कोरोना आणि म्युकरमायकोसिस यांसारख्या आणखी किती साथीच्या रोगांचा सामना करावा लागणार आहे, हे कुणालाही ठाऊक नाही. लोकहो, यावरून लक्षात येणारी भीषण आपत्काळाची तीव्रता जाणून आतातरी साधना करा ! साधना केली, तरच देव प्रत्येक संकटातून वाचवेल !
मुंबई – देशात कोरोनाची महामारी चालू असतांना आता म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) या दुसर्या रोगाने डोके वर काढले आहे. महाराष्ट्रात या रोगाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून या रुग्णांची संख्या २ सहस्रांपर्यंत पोचली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून ‘ब्लॅक फंगस’ला ‘महामारी’ घोषित करण्याची सूचना दिली आहे.
महाराष्ट्रात ‘ब्लॅक फंगस’ मुळे आतापर्यंत ९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील या रोगाचा वेगाने होणारा प्रसार लक्षात घेत आता न्यायालयाने यामध्ये लक्ष घातले आहे. याविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर विभागीय खंडपिठाने राज्यशासन, तसेच ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अॅथॉरिटी’ आणि ‘ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ यांना ‘ब्लॅक फंगस’वरील औषधांविषयी काही सूचना दिल्या आहेत.
औषधांचे मूल्य आवाक्यात आणण्यासाठी शासनाने पावले उचलणे आवश्यक ! – मुंबई उच्च न्यायालय
‘ब्लॅक फंगस’ या रोगाची स्थिती अशीच राहिल्यास त्यावर उपचार करणे अनेक रुग्णांच्या आवाक्याबाहेर असू शकते. त्यामुळे औषधांचे मूल्य आवाक्यात आणण्यासाठी शासनाने पावले उचलावीत. औषधांच्या उत्पादनाचे नियमन करण्यासाठी, तसेच उत्पादन क्षमता वाढवून त्यांचे वितरण करण्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना शासनाने द्याव्यात. आम्ही ‘नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अॅथॉरिटी’ला याकडे लक्ष देण्याची विनंती करू, तसेच शक्य असल्यास या औषधांचे मूल्य एका विशिष्ट स्तरापर्यंत अल्प करण्यास सांगू, असे न्यायालयाने म्हटले आहे.