गोमेकॉतील रुग्णभरती निम्म्याने घटली, तर मडगाव येथेही कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये प्रथमच चांगले वृत्त

पणजी, २० मे (वार्ता.) – गोव्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये प्रथमच चांगले वृत्त समोर आले आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉत) भरती होणार्‍या रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत निम्म्याने घट झाली आहे. गोमेकॉत मागील २४ घंट्यांत कोरोनाबाधित ६८ नवीन रुग्णांना भरती करण्यात आले आहे. गेले काही दिवस एका दिवसात १३५ कोरोनाबाधित रुग्णांना भरती करण्यात आले होते. याविषयी अधिक माहिती देतांना गोमेकॉचे अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले, ‘‘गोमेकॉच्या सूपर स्पेशालिटी विभागात ३० खाटा रिकाम्या आहेत. गोमेकॉत आता कोरोनाबाधित ७६८ रुग्ण उपचार घेत आहेत. कोणत्याही रुग्णाला आता स्ट्रेचर किंवा भूमीवर झोपावे लागत नाही.’’ कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे, असे एवढ्यात म्हणू शकत नाही. अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे’, असे आम्ही अद्याप म्हणू शकत नाही. यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

गोमेकॉत ‘ब्लॅक फंगस’ची नवीन प्रकरणे नाहीत

गोमेकॉत कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ची नवीन प्रकरणे नोंद झालेली नाहीत. गोमेकॉत यापूर्वी कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ‘ब्लॅक फंगस’ची ६ प्रकरणे नोंद झाली होती आणि यामधील एक रुग्ण दगावला होता. ‘ब्लॅक फंगस’वर उपचार करण्यासाठी राज्यशासनाकडे पुरेशा प्रमाणात औषधे उपलब्ध आहेत. ‘ब्लॅक फंगस’ची खासगी रुग्णालयात किती प्रकरणे आहेत, याची माहिती आमच्याकडे नाही, अशी माहिती अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.

खासगी रुग्णालयांमध्ये खाटांविषयी चौकशीसाठी ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसिद्ध

राज्यशासनाने खासगी रुग्णालयांमध्ये खाटांविषयी चौकशीसाठी (०८३२) २४९४५४५ हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसिद्ध केला आहे.

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातही रुग्णसंख्या घटली

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत आहे. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात ५३० खाटा उपलब्ध आहेत. १९ मे या दिवशी सायंकाळपर्यंत यातील ४२ खाटा रिक्त होत्या. रुग्णालयात भरती होणार्‍या रुग्णांची संख्याही घटत आहे.