कोरोनाशी लढतांना सातत्याने पालट आणि प्रयोग करणे आवश्यक ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – कोरोना महामारी ही गेल्या १०० वर्षांतील सर्वांत मोठे संकट आहे. कोरोना संसर्गाने तुमच्या समोरच्या आव्हानांत वाढ केली आहे. याअगोदरचे साथीचे आजार असोत किंवा कोरोनाचा संसर्ग असो, याने आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकवली आहे आणि ती म्हणजे अशा परिस्थितीत संकटांशी दोन हात करण्याच्या प्रयत्नांत सातत्याने आवश्यक पालट आणि प्रयोग करणे अत्यंत आवश्यक आहे. हा विषाणू आपली रूपे पालटण्यात चलाख आहे. त्यामुळे आपल्या पद्धती आणि रणनीती विस्तृत असायला हव्यात, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० राज्यांचे मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेतच्या ऑनलाईन बैठकीत केले.

पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली सूत्रे

१. एका लसीचा अपव्यय म्हणजे एका आयुष्याला आवश्यक ते सुरक्षा कवच प्रदान करण्यात अपयश असल्याने लसींचा अपव्यय टाळला पाहिजे.

२. प्रत्यक्ष युद्धभूमीवर केलेल्या कार्यातून, आपल्या अनुभवातून आणि त्यातून सुचवलेल्या सल्ल्यांतून व्यवहारिक अन् प्रभावी रणनीती आखता येऊ शकते.

(म्हणे) ‘आम्हाला बोलूच दिले नाही !’ – ममता बॅनर्जी यांचा आरोप

कोलकाता – पंतप्रधान मोदी यांच्या या बैठकीला बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या. या बैठकीनंतर त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, या बैठकीला १० राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणून मी उपस्थित होते. त्यामुळे मी जिल्हाधिकार्‍यांना या बैठकीला उपस्थित राहू दिले नाही. भाजपचे काही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी त्यांची सूत्रे मांडली; मात्र मला बोलण्याची संधी मिळाली नाही. सर्व मुख्यमंत्री केवळ गप्प बसून होते. कुणीही काहीही बोलले नाही. आम्हाला कोरोना लसीची मागणी करायची होती; मात्र बोलूच दिले गेले नाही, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, कोरोना संसर्ग न्यून होत असल्याचे मोदी म्हणाले; मात्र आधीही असेच झाले होते. आम्ही ३ कोटी लसीची मागणी करणार होतो. या मासामध्ये २४ लाख लसी मिळणार होत्या; मात्र केवळ १३ लाख लसी मिळाल्या.