गोव्यात दळणवळण बंदीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याचे उघड

गेल्या २४ घंट्यांत ३१ कोरोनाबाधितांचा  मृत्यू, तर १ सहस्र २०९ नवीन रुग्ण

पणजी – गोव्यात दळणवळण बंदीनंतर दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात घट होत असल्याचे निदर्शनास येत आहे. १९ मे या दिवशी ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. गोमेकॉमधील १८, तर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला आणि १ मृत्यू उत्तर गोव्यातील खासगी रुग्णालयात झाला. यामुळे कोरोनामृतांची संख्या २ सहस्र २२८ झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ३ सहस्र ८७३ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १ सहस्र २०९ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण ३१.२१ टक्के झाले आहे. दिवसभरात २ सहस्र १६० रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित १३९ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून २२ सहस्र ९६४ झाली आहे.

खासगी रुग्णालयांत आता अत्यवस्थ रुग्णांनाही प्रवेश देणार ! -आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे

पणजी  सर्व कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्यविषयक सुविधा मिळण्यासाठी आता खासगी रुग्णालये प्राथमिक अवस्थेतील रुग्णांसमवेतच अत्यवस्थ रुग्णांनाही प्रवेश देणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली आहे. ते म्हणाले, ‘‘जर कोणत्याही रुग्णालयाने रुग्णाला प्रवेश देण्यास नकार दिला, तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल.’’

शासनाने किरकोळ विक्रेते आणि अत्यावश्यक साहित्य वितरण करणारे कामगार यांना ‘फ्रंटलाईन योद्धा’ घोषित करावे ! – गोवा वाणिज्य आणि उद्योग परिषद

गोवा राज्यात किरकोळ विक्रेते आणि अत्यावश्यक साहित्याचे वितरण करणारे कामगार यांना ‘फ्रंटलाईन योद्धा’ म्हणून शासनाने घोषित करावे, अशी मागणी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री’ने (गोवा वाणिज्य आणि उद्योग परिषदेने) मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, अशा कामगारांना प्राधान्याने लस देण्यात यावी, ज्यामुळे त्यांना निर्धास्तपणे काम करता येईल, तसेच यामुळे कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यास साहाय्य होईल.

राज्यातील कोरोनाविषयक परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी वाढवण्याचा निर्णय घेणार !  मुख्यमंत्री प्रमोद सावंत

डॉ. प्रमोद सावंत

पणजी, १९ मे (वार्ता.) – गोवा राज्यात संचारबंदी वाढवण्याविषयीचा निर्णय शनिवारपर्यंत (२२ मेपर्यंत) घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्याकडून राज्यातील कोरोनाविषयक स्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात येईल.’’ गोव्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे गोवा शासनाने ९ मे ते २३ मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली होती आहे.