‘१७ ते २०.१.२०१८ या कालावधीत डोंबिवली येथील ‘विशाखा नृत्यालया’च्या संचालिका सौ. ज्योती शिधये आणि त्यांच्या नृत्यालयातील १२ विद्यार्थिनी रामनाथी आश्रमात आल्या होत्या. त्या वेळी आश्रम, तसेच सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून आणि आश्रमात नृत्य केल्यावर त्यांना जाणवलेली सूत्रे अन् अभिप्राय येथे दिले आहेत.
१. रामनाथी आश्रम पाहून जाणवलेली सूत्रे
१ अ. ‘आश्रमात रहाणे’, हा जीवनातील सर्वांत आनंदाचा क्षण असल्याचे जाणवून आश्रमात सकारात्मक ऊर्जा मिळणे : ‘आश्रम पाहून एक वेगळाच आनंद जाणवला. येथील साधकांकडून शिस्त, मोजके बोलणे आणि सदैव हसत रहाणे, हे गुण शिकायला मिळाले. साधकांना भेटून जिव्हाळा निर्माण झाला आणि ‘ते आपल्यातीलच आहेत’, असे वाटले. येथील स्वयंपाकघरातील शिस्त मला पुष्कळ आवडली. धान्यविभाग, तसेच सर्व विभाग सुंदर आणि स्वच्छ होते. ध्यानमंदिरात पुष्कळ आनंद जाणवला. आश्रमातील भिंतीला स्पर्श केल्यावर माझ्यातील जडत्व जाऊन माझ्या शरिरात एक प्रकारची चेतना निर्माण झाली. ‘आश्रमात रहाणे’, हा माझ्या जीवनातील सर्वांत आनंदाचा क्षण असून माझ्या गुरूंमुळे तो मला मिळाला आहे. आश्रमातून परत जातांना मी पूर्णपणे पालटून जाणार आहे. आश्रम बघून मला सकारात्मक ऊर्जा मिळाली. मी स्वतःतील नकारात्मक ऊर्जा इथेच सोडून देऊन यापुढे नवीन आयुष्याला आरंभ करणार आहे. येथील सर्व साधकांना पाहिल्यावर ‘मी आज माहेरी आली आहे’, असे वाटून मला आता हे माहेर मला सोडवत नाही.’ – सौ. चारुशीला गोरे, नृत्यालया’च्या संचालिका, डोंबिवली, ठाणे. (१९.१.२०१८)
१ आ. ‘प्रथम आश्रम ही एक सुंदर वास्तू वाटत होती; पण आत शिरल्यावर येथे ऊर्जेचा मोठा साठा जाणवला.’ – सौ. राधा पतंगे
१ इ. आश्रमात अनेक साधक मिळून-मिसळून आणि शांततेने सेवा करतात ! : ‘आश्रमामध्ये अद्भुत अनुभव आला. एवढे सर्व लोक मिळून-मिसळून सतत सेवा करतात आणि तेही शांततेने ! हे सर्व साधनेचे फळ आहे. ‘शांती आणि संयम बाळगून आपापले काम करत रहायचे’, ही माझ्यासाठी सर्वांत मोठी शिकवण आहे. येथे राहून पुष्कळ चांगले वाटले आणि पुष्कळ शिकायला मिळाले. हे शिकलेले कृतीत आणले, तर ‘आपल्या जीवनाचे सार्थक होईल’, असे वाटत आहे.’ – सौ. अलकनंदा मुखर्जी
१ ई. आश्रमात सात्त्विकतेची जाणीव झाली ! : ‘आश्रमात प्रवेश केल्यावर प्रथम सात्त्विकतेची जाणीव झाली. आश्रमातील शिस्त आणि सर्व साधकांची सेवेतील तत्परता शिकायला मिळाली. इथे प्रत्येक ठिकाणी देवाची अनुभूती येत होती.’ – कु. चिन्मयी रविंद्र साळवी (नृत्य प्रभाकर, विशारद), ठाणे, महाराष्ट्र.
१ उ. आश्रमाविषयी कुतूहल वाटणे : ‘आश्रमात प्रवेश केल्यावर पुष्कळ प्रसन्न वाटले. सर्व साधक पुष्कळ आपुलकीने आणि मनापासून वागत होते. याविषयी मला पुष्कळ कुतूहल वाटते. आश्रमातील नियोजन व्यवस्था पुष्कळ प्रभावी वाटली.’ – कु. विशाखा शिधये
१ ऊ. आश्रमात आल्यावर मन प्रसन्न होऊन स्वतःत नवचैतन्य निर्माण झाल्याचे जाणवणे : ‘आश्रमात आल्यावर मन प्रसन्न झाले. साधकांची सेवा, साधना, स्वच्छता, शिस्त, नियमांचे पालन आणि समयसूचकता हे सर्व पाहून माझ्यातील सकारात्मक ऊर्जेची जाणीव झाली. मनाचा उत्साह वाढल्यामुळे ‘आपणही आपल्यात पालट करावेत’, असे मला वाटले. येथे ‘ऊर्जेचा प्रवाह सतत चालू आहे’, असे मला वाटले. ध्यानमंदिरात मला ध्यान लागल्याचे अनुभवता आले. हा अनुभव मी प्रथमच अनुभवला. ‘माझ्यात नवीन चैतन्य निर्माण झाले आहे’, असे मला वाटले. माझ्या मनात ‘सूक्ष्म शक्ती असतात कि नाही ?’, असा प्रश्न होता; परंतु आश्रमात फिरतांना मला शक्ती जाणवली. मला आश्रमातील प्रत्येक साधकामध्ये प्रेम, साहाय्य करण्याची वृत्ती आणि तोंडवळ्यावर हास्य जाणवले.’ – सौ. आल्पा सोनगिरे, गोरेगाव, माणगाव, रायगड.
१ ए. आश्रमातील साधक आणि संत यांच्यात विलक्षण सकारात्मकता आहे ! : ‘आश्रमातील नैसर्गिक वातावरणामुळे तेथे प्रसन्न वाटत होते. तेथील स्वच्छता, टापटीपपणा मन आणि लक्ष वेधून घेणारा होता. साधक आपल्या चुका प्रामाणिकपणे स्वीकारतात, हे पुष्कळ परिणामकारक होते. भोजन कक्षातील स्वयंसेवा आणि आश्रम आवारातील आप, तेज यांचा वातावरणावरील प्रभाव आश्चर्यकारक होता. आपल्या नैसर्गिक हालचाली आणि सवयी यांचा वातावरणावर होणारा प्रभाव यापूर्वी मी कधी अनुभवला नव्हता. येथील साधक आणि संत यांच्यामध्ये विलक्षण सकारात्मकता होती.’ – कु. स्वरूपा मकरंद भोंदे
१ ऐ. आश्रम अतिशय स्वच्छ आणि सुनियोजित आहे ! : ‘आश्रम अतिशय स्वच्छ आणि सुनियोजित आहे. प्रत्येक ठिकाणी सूचना लिहिल्यामुळे वस्तूंचा वापर करणे सोपे होते. सर्व साधक साहाय्य करण्यास तत्पर असल्यामुळे येथील अनुकूल वातावरणाशी अल्प वेळेत एकरूप होता आले आणि प्रसन्न वाटले.’ – कु. निशिगंधा विश्वास केतकर
१ ओ. आश्रमातील सर्वत्रचे नियोजन पाहून ‘आपणही यांच्याप्रमाणे सवयी लावून घेतल्या पाहिजेत’, असे वाटणे : ‘आम्ही डोंबिवलीहून पहाटे लवकर निघालो होतो. आश्रमात आल्यावर येथील वातावरणामुळे प्रवासामुळे आलेला थकवा नाहीसा झाला. प्रत्येक साधक आपले काम न चुकता चोखपणे करत होता. कुणाच्याही तोंडवळ्यावर कंटाळा दिसत नव्हता. ते पाहून आमचा उत्साह वाढला आणि आमच्या तोंडवळ्यावरही हास्य दिसू लागले. आमच्यात सकारात्मकता जाणवत होती. स्वयंपाकघर आणि इतर ठिकाणचे सर्व नियोजन पाहून ‘आपणही यांच्याप्रमाणे सवयी लावून घेतल्या पाहिजेत’, असे मला वाटले.’ – कु. श्रुती गद्रे (नृत्य प्रभाकर)
१ औ. आश्रमामुळे स्वतःचेे दैनंदिन आयुष्य शिस्तबद्ध करण्याची प्रेरणा मिळाली ! : ‘आता मला बरेच प्रश्न पडणारच नाहीत; कारण येथे मला माझे दैनंदिन आयुष्य शिस्तबद्ध करण्याची प्रेरणा मिळाली आहे. ‘आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य कसे करावे ?’, हे मी अनुभवले. यापुढे माझ्याकडे येणारा प्रत्येक अतिथी ‘स्वामी’च असेल. नृत्याद्वारे साधना करण्याचा प्रकाशमय मार्ग मला दाखवला. येथे आल्यावर जे संस्कार झाले, ते सर्व मी माझ्यासमवेत घेऊन जाणार आहे.’ – सौ. प्राजक्ता सचिन करंदीकर
१ अं. मन प्रसन्न होऊन आश्रमात आपुलकी जाणवली ! : ‘आश्रम पाहून संपूर्णत्वाची अनुभूती आली. आनंद आणि शुद्ध वातावरण यांमुळे मन पुष्कळ प्रसन्न झाले. येथे घरासारखी आपुलकी जाणवली.’ – कु. भाविशा देढीया
२. सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून जाणवलेली सूत्रे
२ अ. कला विभागातील चित्र बघतांना सूक्ष्माचा अभ्यास होणे : ‘आम्हाला कला विभागामध्ये दोन चित्रांमधील स्पंदनांचा अभ्यास करायला मिळाला. शिवाच्या चित्रावर हात ठेवल्यावर त्याच्या कपाळाच्या मध्यभागी स्पंदनांची, तर दुर्गादेवीच्या चित्रातून शांततेची स्पंदने आणि श्वासाची जाणीव झाली. याप्रमाणे रांगोळी आणि मेंदीची वेलवीण यांतील सूक्ष्म अभ्यास लक्षात आला. ‘वेलवीणमध्ये अतिशय लहानशी सुधारणा केल्यावर त्यातील स्पंदने पालटतात’, हे जाणवले आणि त्यामागील अर्थ समजला. साधकांनी या कलाकृतींची मनापासून माहिती दिली.’
– कु. विशाखा शिधये (क्रमश:वाचा उद्याच्या अंकात)
|