तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह रायगड येथेही पुष्कळ हानी !

मुंबई – १७ मे या दिवशी आलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडून पाणी साठले. पाऊस आणि वादळ यांनी मुंबईला तर अक्षरशः झोडपून काढले.

१. चक्रीवादळामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली होती, तर मोनो रेल्वेची सेवा स्थगित करण्यात आली. वांद्रे-वरळी सी लिंकवरून होणारी वाहतूकही रोखण्यात आली होती,

२. नवी मुंबईत दुचाकीवर झाड कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर उल्हासनगरमध्ये एका रिक्शावर झाड कोसळल्याने दोन प्रवासी गंभीर घायाळ झाले आहेत.

३. वादळामुळे मुंबईच्या समुद्रामध्ये दोन मोठी जहाजे भरकटली आहेत. नौदलाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. एका जहाजावर २७३, तर दुसर्‍या जहाजावर १३७ जण आहेत. या जहाजांच्या साहाय्यासाठी आय.एन्.एस्. कोच्ची, आय.एन्.एस्. कोलकाता या दोन मोठ्या युद्धनौका पाठवण्यात आल्या आहेत.

४. रायगड जिल्ह्यात १ सहस्र २०० घरांची हानी झाली आहे. सहस्रावधी लोकांचे स्थलांतर करण्यात आले. पनवेल परिसरातही अनेक इमारतींच्या वरील पत्रे उडाले.

५. पालघर परिसरात काही घरांची पडझड झाली.

६. श्रीवर्धन, मुरूड, रोहा, अलिबाग, महाड येथील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पोलादपूर, महाड, रोहा या ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत.