सीबीआयकडून तृणमूल काँग्रेसच्या २ मंत्र्यांससह एका आमदाराला अटक

बंगालमधील नारदा घोटाळा

देशातील बहुतेक राजकारणी भ्रष्टाचारी आहेत, असे जनतेला वाटते. ते चुकीचे आहे, असा दावा एकही राजकारणी करू शकत नाही, हेही तितेक खरे आहे. त्यामुळे भ्रष्ट राजकारण्यांऐवजी धर्माचरणी लोकांचे हिंदु राष्ट्रच स्थापन केले पाहिजे !

मलाही अटक करा ! – ममता बॅनर्जी

कोलकाता – केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) राज्यातील नारदा घोटाळ्याच्या प्रकरणी राज्याचे मंत्री फिरहाद हकीम आणि सुव्रत मुखर्जी, तसेच तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा आणि माजी भाजपचे नेते सोवन चॅटर्जी यांना अटक केली आहे. या चौघांच्याही घरावर धाड टाकून त्यांना अटक करण्यात आली.

मलाही अटक करा ! – ममता बॅनर्जी

अशा पद्धतीने मंत्र्यांची आणि आमदारांची अटक राज्यघटनाविरोधी आहे. राज्य सरकार किंवा न्यायालयाच्या नोटिशीविना या चारही नेत्यांची अटक केली जाऊ शकत नाही. या नेत्यांना अटक केली, तर मलाही अटक करा, असे आव्हान राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय अधिकार्‍यांना दिले. चारही नेत्यांना कह्यात घेऊन सीबीआय कार्यालयात नेण्यात आल्यावर ममता बॅनर्जी त्यांच्या अधिवक्त्यांसहित येथील सीबीआयच्या कार्यालयात जाऊन हे आव्हान दिले.
सभापती बिमान बॅनर्जी यांनी म्हटले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही आमदाराला अटक करण्यापूर्वी सभापतींची अनुमती घेणे आवश्यक आहे; परंतु माझ्याकडून अशा प्रकारची कोणतीही अनुमती घेण्यात आलेली नाही.

राज्यपालांची अनुमती !

सीबीआयनने बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांच्याकडून या प्रकरणात फिरहाद हकीम, सुव्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चॅटर्जी यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची अनुमती घेतली होती. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच राज्यपालांनी सीबीआयला खटला प्रविष्ट करण्याची अनुमती दिली होती.

ममता बॅनर्जी सीबीआयच्या कार्यालयात असतांना तृणमूल कार्यकर्त्यांची सीबीआय कार्यालयावर दगडफेक

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सीबीआय कार्यालयात गेल्यावर कार्यालयाबाहेर जमलेल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयावर जोरदार दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर लाठीमार करावा लागला. राज्यपाल जगदीप धनखड यांनी कोलकाता पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. कोलकाता पोलीस कायद्याचे पालन करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

काय आहे नारदा घोटाळा ?

वर्ष २०१६ मध्ये बंगालमध्ये निवडणुकीपूर्वी नारदा स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ  सार्वजनिक करण्यात आला होता. वर्ष २०१४ मध्ये हे ऑपरेशन करण्यात आले होते. यामध्ये तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि आमदार एका काल्पनिक आस्थापनाच्या प्रतिनिधीला रोख रक्कम घेतांना दिसत होते. हे स्टिंग ऑपरेशन ‘नारदा न्यूज पोर्टल’च्या मॅथ्यू सॅम्युअल यांनी केले होते. कोलकाता उच्च न्यायालयाने वर्ष २०१७ मध्ये या स्टिंग ऑपरेशनची सीबीआय चौकशी करण्याचा आदेश दिला होता. या स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अनेक नेत्यांचीही नावे आहेत.