कोल्हापूर – तौक्ते चक्रीवादळामुळे कोल्हापुरात १६ मे या दिवशी वार्यासह मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पावसासमवेत गार वारेही मोठ्या प्रमाणात होते. यामुळे वातावरणात एकदम थंडावा निर्माण झाला होता. जोरदार वारा असल्याने अनेक ठिकाणी विद्युत् तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचार्यांनी युद्धपातळीवर हा पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पावसामुळे शहरात काही ठिकाणी झाडे पडली, तर गांधीनगर येथील दोन झाडे कोसळून पडली आणि तीन ठिकाणच्या इमारतीवरील पत्र्याच्या शेड उडाल्या. यात तीन दुचाकींसह एका चारचाकी गाडीची हानी झाली आहे.
बेळगाव – शहरासह खानापूर आणि ग्रामीण भागात दिवसभर संततधार पाऊस पडत होता. पावसाचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना बसणार आहे. दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे काही पिकांनाही किडीचा धोका उद्भवू शकतो.
पुणे – शहरातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला.
अमरावती शहरात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली !
अमरावती – ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांत ३ दिवस पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार १६ मे या दिवशी शहरात वादळी वार्यासह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडांची मोठी पडझड झाली असून वाहनांचीही मोठी हानी झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत् रोहित्रेही कोसळली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय परिसराजवळच्या रस्त्यांवर उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर झाड कोसळले, तर शहरातील बियाणी चौक, तसेच विद्यापीठ परिसरात वादळी वार्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत.