४५ किलो किराणा सामान घेऊन दिले !
असे पोलीस सर्वत्र हवेत !
संभाजीनगर – शहरात कोरोना काळात अडचणीत सापडलेल्या एका महिलेला पोलीस कर्मचार्यांनी पैशांची जमावाजमव करून ४५ किलो किराणा सामान घेऊन दिले.
येथील आंबेडकर चौकात सिडको पोलीस ठाण्याचे कर्मचारी १२ मे या दिवशी बंदोबस्तासाठी उभे होते. त्या वेळी अत्यंत घाबरलेल्या अवस्थेतील एक महिला ३ मुलांसमवेत त्यांच्याकडे आली. ‘माझी मुले उपाशी आहेत, मला साहाय्य नको; पण हाताला काहीतरी काम द्या’, अशी रडतरडत तिने पोलिसांना विनंती केली. हे पाहून पोलीस नाईक प्रकाश भालेराव यांनी त्या महिलेला धीर दिला. (या प्रसंगातून ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसांच्या ब्रीदवाक्याचे येथे सार्थक झाल्याचे दिसून येते. पोलिसांनी जनतेला असाच आधार देऊन कठीण प्रसंगात साहाय्य केल्यास पोलिसांचा जनतेला खर्या अर्थाने आधार वाटेल. – संपादक)
भालेराव यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना याची माहिती दिली. त्यांनी ‘तिला सर्वतोपरी साहाय्य करा’, असे सांगत नाकेबंदीतून काही जणांना सवलत दिली. भालेराव आणि इतर पोलीस यांनी वर्गणी गोळा करून ४५ किलो किराणा सामान घेऊन तिला दिले. गिरी यांच्या सूचनेवरून पोलिसांनी त्या महिलेला रिक्शातून हिनानगरातील तिच्या घरीही नेऊन सोडले. एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी त्या महिलेला काम मिळवून देण्याचा विश्वासही दिला. या महिलेच्या पतीचे ५ वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर ती घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होती; मात्र ‘दळणवळण बंदी’मुळे घरकाम बंद झाले होते.