मुख्य सचिव पुनित कुमार गोयल यांनी व्यक्त केली हतबलता !
पणजी – गोमेकॉतील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रतिदिन ऑक्सिजनच्या ७२ ट्रॉलींची आवश्यकता आहे. एका ट्रॉलीत ४८ सिलिंडर असतात आणि अशी प्रत्येक ट्रॉली दर २० मिनिटांनी गोमेकॉत पोचली पाहिजे. गोमेकॉला ऑक्सिजनचा पुरवठा करणारे आस्थापन प्रतिदिन १ सहस्र १०० सिलिंडर पुरवू शकते. आमची इच्छा असली, तरी गोमेकॉला प्रतिदिन ७२ ट्रॉली पुरवणे अशक्य आहे. गोमेकॉला सर्वाधिक म्हणजे प्रतिदिन ५५ ट्रॉलीचा पुरवठा केला जाऊ शकतो, अशी माहिती राज्याचे प्रधान सचिव पुनित कुमार गोयल यांनी उच्च न्यायालयाला दिली.
यावर गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. बांदेकर म्हणाले, ‘‘गोमेकॉत दुपारी २ वाजेपर्यंत ५००, तर रात्री १० वाजेपर्यंत आणखी २५० आणि सकाळी ६ वाजेपर्यंत आणखी २५० जंबो ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासते.’’
आरोग्य खात्याचे सचिव रवि धवन सुनावणीच्या वेळी म्हणाले, ‘‘गोमेकॉला ऑक्सिजनचा पुरवठा करणार्या ‘स्कूप’ या आस्थापनाला ६०० जंबो ऑक्सिजन सिलिंडर आणि ५५ ट्रॉली पुरवण्यास सांगण्यात आले आहे. राज्यात किमान ५५ मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. गोमेकॉलाच २० मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यशासनाकडून केंद्राकडे गोव्याला ऑक्सिजनचा पुरवठा वाढवून तो २६ मेट्रीक टनवरून ४० मेट्रीक टन करण्याची मागणी करण्यात आली आहे.’’
गोमेकॉतून रुग्णांना अन्यत्र स्थलांतर केल्याने समस्या सुटणार नाही ! – गोमेकॉ
खंडपिठाने सुनावणीच्या वेळी गोमेकॉ व्यवस्थापनाला गोमेकॉतील रुग्णांना अन्यत्र स्थलांतर केल्याने प्रश्न सुटणार का ? असे विचारले असता गोमेकॉचे अधिकारी म्हणाले, ‘‘गोमेकॉतील रुग्णांना अन्यत्र स्थलांतर करणे खूप कठीण आहे. स्थलांतर करतांना रुग्ण दगावू शकतात, तसेच असे केल्याने ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी विशेष लाभ होणार नाही.’’
गोमेकॉची समस्या हाताळण्याची पद्धत चुकीची
गोमेकॉच्या प्रतिनिधीने ऑक्सिजनच्या अभावी उच्च दाबाने नाकावाटे ऑक्सिजन देण्याची (‘एच्.एफ्.एन्.ओ.’) यंत्रणा वापरत नसल्याचे खंडपिठाला सांगितले. यावरून खंडपिठाने गोमेकॉच्या प्रतिनिधीला खडसावतांना म्हटले, ‘‘गोमेकॉकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही. गोमेकॉची समस्या हाताळण्याची पद्धत चुकीची आहे. गोमेकॉने ‘एच्.एफ्.एन्.ओ.’ यंत्रणेचा वापर केला पाहिजे.’’
१२ मेच्या रात्री ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू होणार नाही, यासाठी काय करता येईल ?
१२ मेच्या रात्री ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू होणार नाही, यासाठी काय करता येईल ? असा प्रश्न खंडपिठाने राज्यशासनाला केला. ते पुढे म्हणाले, ‘‘यापुढे ऑक्सिजनच्या अभावामुळे कुणाचाही मृत्यू होऊ नये, यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. राज्यशासनाने आताच्या घडीला गोमेकॉला मागणीनुसार ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.’’ खंडपिठात याविषयी गुरुवारीही सुनावणी चालू रहाणार आहे.
जीवनावश्यक वस्तू घेऊन येणार्या ट्रकांवरील २ चालक आणि एक वाहक यांना गोवा प्रवेशासाठी कोरोना नकारात्मक (निगेटिव्ह) दाखला बंधनकारक नाही ! – गोवा खंडपीठ
राज्यशासनाच्या विनंतीवरून गोवा खंडपिठाने गोव्यात जीवनावश्यक वस्तू घेऊन येणार्या ट्रकांवरील २ चालक अन् १ वाहक यांना प्रवेश करण्यासाठी कोरोना नकारात्मक (निगेटिव्ह) दाखला बंधनकारक असल्याची अट शिथिल केली आहे; मात्र दोन्ही चालक आणि एक वाहक यांचे शरिराचे तापमान ‘थर्मल गन’च्या माध्यमातून तपासणे आवश्यक असून २ चालक आणि वाहक यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्यास त्यांना गोव्यात प्रवेश देऊ नये, असेही म्हटले आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय आपत्कालीन स्थिती व्यतिरिक्त गोव्यात प्रवेश करणार्या सर्वांना प्रवासाच्या ७२ घंटे पूर्वीपासूनचा कोरोना नकारात्मक (निगेटिव्ह) दाखला बंधनकारक रहाणार आहे, असे गोवा खंडपिठाने पुढे म्हटले.
गोमेकॉमध्ये ‘डुरा’ (Dura) सिलिंडर आणणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
गोमेकॉतील ऑक्सिजनचा तुटवडा दूर करण्यासाठी ‘डुरा’ सिलिंडर आणण्यात येणार आहे. प्रत्येक ‘डुरा’ सिलिंडरची क्षमता २८ जंबो सिलिंडरएवढी असते. ‘डुरा’ सिलिंडरमध्ये द्रवरूपात वैद्यकीय ऑक्सिजन (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) असतो, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्वीटवरून दिली.