ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आनंदनगर येथे महापौर नरेश म्हस्के यांच्या प्रभागामध्ये ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांसाठी कोरोनावरील लस देण्यासाठी लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मी आणि अन्य एक साधिका कोरोनाची लस घेण्यासाठी या केंद्रावर गेलो होतो. तेथे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, यासाठी एखाद्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे काळजी घेण्यात आली होती.
१. लसीकरणासाठी येणार्या नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी मोठा मंडप घालण्यात आला होता.
२. मंडपात योग्य अंतर राखून बसण्यासाठी पुरेशा प्रमाणात आसंद्या आणि पंखे यांची सोय होती.
३. सर्वांनी मास्क घालावे, रांगेत उभे रहावे, एकमेकांमध्ये योग्य अंतर राखावे, यांची आठवण करून देण्यासाठी थोड्या-थोड्या वेळानेे ध्वनीवर्धकावरून सूचना देण्यात येत होत्या.
४. केंद्रावरील वृद्धांना लसीकरणासाठी तेथील स्वयंसेवक साहाय्य करत होते.
५. ज्या ज्येष्ठ नागरिकांना पायर्या चढून लसीकरणासाठी वर जाणे कष्टदायक होत होते, अशांना आधुनिक वैद्यांनी त्यांच्या जवळ जाऊन लस दिली.
६. लस घेतल्यानंतर ताप आल्यास उपचारासाठी प्रत्येकाला २ ‘पॅरासिटेमॉल’च्या गोळ्या दिल्या जात होत्या.
७. कुठेही गडबड-गोंधळ नव्हता. ‘लसीकरण करण्यासाठी नोंदणी करून स्वत:चे टोकन घेऊन मगच रांगेत येऊन उभे रहावे’, अशी कार्यपद्धत ठेवण्यात आल्याने लसीकरण शिस्तबद्ध चालू होते.
८. तेथील प्रमुख महिला वैद्यकीय अधिकार्यांचे बोलणे आणि वागणे सौहार्दपूर्ण होते.
सद्यस्थितीत रुग्णालयांमध्ये रुग्णांकडे होत असलेले दुर्लक्ष, प्रशासकीय व्यवस्थेमधील ढिसाळपणा आदी प्रकार पहाता आनंदनगर लसीकरण केंद्रावरील उदाहरण सर्वांसाठीच अनुकरणीय आहे.
– श्रीमती संध्या काटदरे, जिल्हा रायगड