कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत बालकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने बालरोगतज्ञांचा ‘टास्क फोर्स’ सिद्ध होत आहे ! – आधुनिक वैद्य जयंत पांढरीकर

जयंत पांढरीकर

अमरावती – कोरोनाची पहिली लाट वृद्धांसाठी जीवघेणी ठरली, तर दुसर्‍या लाटेत अनेक तरुणांना प्राण गमवावे लागले. आता जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे संकेत दिले आहे. तिसर्‍या लाटेत बालकांवर परिणाम होण्याची भीती आहे. हे नवे संकट पाहून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली बालरोगतज्ञांची ‘टास्क फोर्स’ सज्ज होत आहे, अशी माहिती महाराष्ट्र बालरोगतज्ञ संघटनेचे अध्यक्ष अन् आधुनिक वैद्य जयंत पांढरीकर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांवर परिणाम करील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे मुलांना लागणारे ‘व्हेंटिलेटर्स’, त्यांना लागणारे ‘ऑक्सिजन’ या सगळ्या सोयी सिद्ध केल्या पाहिजेत. मुलांसाठीचे अतीदक्षता विभाग (आयसीयू) सिद्ध झाले पाहिजेत. नवजात बालकांवर उपचाराचीही व्यवस्था करायला हवी. यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला असून आमच्या महाराष्ट्र बालरोगतज्ञ संघटनेतील ५ सहस्र सदस्य शासनाच्या साहाय्यासाठी सक्रीय सहभाग घेणार आहेत. ग्रामीण भागातील आधुनिक वैद्यांनाही उपचारपद्धतीची माहिती व्हावी, यासाठी येत्या २ सप्ताहांत आम्ही उपचार संबंधित प्रशिक्षण देण्याचे काम राज्यभर चालू करणार आहोत. यात एकूण १० सहस्र बालरोगतज्ञांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.