मुंबई – महावितरणच्या ३५ सहस्र ६०० नियमित आणि बाह्यस्रोत कर्मचार्यांना कोरोनाची प्रतिबंधक लस देण्यात आली असून सध्या २ सहस्र २२१ कर्मचारी कोरोनाबाधित आहेत, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली आहे.
सद्यस्थितीत अनेक जण घरूनच काम करत असल्याने घरगुती ग्राहक, कोरोनाची रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्र आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे कर्मचारी अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत; पण त्यातूनच कर्मचारी बाधित होण्याच्या संख्येतही वाढ होत आहे. लसीकरणाची गती वाढवण्यासाठी मुख्यालयाकडून संबंधित सर्व शासकीय यंत्रणांकडे युद्धपातळीवर पाठपुरावा चालू आहे.
राज्यात सद्यस्थितीत अतिरिक्त १० ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसह ३९ कोविड रुग्णालयांना २४ घंट्यांमध्ये नवीन वीजजोडणी किंवा वाढीव वीजभार कार्यान्वित करण्याची कामगिरी महावितरणने केली आहे, अशी माहिती सिंघल यांनी दिली.