शत्रूराष्ट्रांची आरोग्य व्यवस्था बिघडवण्यासाठी चीनने जाणीवपूर्वक कोरोना विषाणू पसरवला ! – चीनच्या महिला डॉक्टरचा दावा

डॉ. ली मेंग यान

नवी देहली – मी गेल्या जानेवारीपासून सांगत आहे की, हा कोरोनाचा विषाणू चिनी सैन्याच्या प्रयोगशाळेमधून निर्माण करण्यात आलेला आहे आणि या विषाणूच्या शोधासाठी चीनने मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांना मोठ्या संशोधनातून माणसांना हानी पोचवणारा हा विषाणू सापडला असून तो त्यांनी हेतूपुरस्सर जगभरात पसरवला. चीनच्या सरकारला हे ठाऊक  आहे आणि म्हणूनच त्यांना काही वेळातच अपेक्षित परिणाम दिसू लागला. या शस्त्राने अधिक मृत्यू होणार नाहीत; मात्र शत्रूराष्ट्रांची आरोग्य व्यवस्था ढासळेल आणि हाच उद्देश हा विषाणू पसरवण्यामागे होता, असा दावा चीनच्या व्हायरोलॉजिस्ट डॉ. ली मेंग यान यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. चीनने वर्ष २०१५ पासूनच जागतिक युद्धासाठी जैविक शस्त्र बनवण्यास प्रारंभ केल्याचे चीनच्या तज्ञांच्या अहवालाद्वारे अमेरिकेच्या गुप्तचरांनी उघड केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर डॉ. ली मेंग यान यांनी त्यांची मते मांडली.

डॉ. ली मेंग यान यांनी सांगितलेली सूत्रे

१. जगावर राज्य करण्यासाठी जैविक शस्त्रे वापरण्याच्या चीनच्या कटाविरुद्धचा पुरावा म्हणून हा अहवाल उपयोगी ठरू शकतो. जेव्हा हा कोरोना विषाणू प्रयोगशाळेमधून बाहेर आल्याचे लोकांना कळेल, तेव्हा ‘चीनने कशी जगाची दिशाभूल केली’, हे सिद्ध करण्यासाठी हा अहवाल उपयोगी ठरू शकतो.

२. ‘हा विषाणू चीनच्या शत्रूराष्ट्रांची वैद्यकीय व्यवस्था ढासळावी, यासाठी पसरवण्यात आला’, हा दावा निश्‍चितच सत्य आहे. या अनियंत्रित अशा जैविक शस्त्राचा वापर करून वैद्यकीय व्यवस्थेवर आक्रमण केले जाते.