नागपूर – शहरातील धंतोली परिसरातील नेल्सन रुग्णालयात एका रुग्णाला १२ रेमडेसिविर इंजेक्शने दिल्याचे देयकात दाखवले आहे. ही घटना म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्याचे सांगत नातेवाइकांनी जिल्हाधिकार्यांकडे याविषयी तक्रार केली आहे. मिलिंद कन्नमवार असे तक्रारदाराचे नाव आहे.
मिलिंद कन्नमवार हे महिला आणि बालकल्याण मंत्र्यांचे स्वीय साहाय्यक असून त्यांची सासू आणि सासरे हे कोरोनाबाधित झाल्याने त्यांना नेल्सन रुग्णालयात भरती करण्यात आले होते. यापैकी एकाचे उपचाराच्या वेळी निधन झाले; परंतु दुसर्या रुग्णाला आधुनिक वैद्याकडून १२ रेमडेसिविर इंजेक्शने दिल्याचे रुग्णालयाकडून मिळालेल्या देयकात दाखवले गेले. प्रत्यक्षात शहरातील बर्याच रुग्णालयांत एका रुग्णाला ६-७ रेमडेसिविर इंजेक्शनहून अधिक मात्रा दिली जात नाही. त्यानंतरही येथे १२ इंजेक्शने कशी दिली ? हा प्रश्न नातेवाइकांनी उपस्थित केला आहे.
कन्नमवार यांच्या नातेवाइकाने तक्रारीत म्हटले आहे की, शासनाने रेमडेसिविरचे ४ सहस्र ८६० रुपये निश्चित केले असतांना येथे त्याचे प्रती इंजेक्शन ५ सहस्र ४०० रुपये लावण्यात आले आहे, तसेच रुग्णालयाकडून देयकातही शासनाच्या नियमांची पायमल्ली करत अतिरिक्त शुल्क लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. दोनपैकी एक रुग्ण सामान्य प्रभागात असतांनाही त्यालाही अतीदक्षता विभागाचे शुल्क लावणे, रुग्णाला एकाच दिवशी ‘मेक्रोक्रीट’ नावाची ३ इंजेक्शने दिली, असेही तक्रारीत म्हटले आहे.
या संदर्भात नेल्सन रुग्णालयातील आधुनिक वैद्य समीर दासरवार म्हणाले की, रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी कितीही इंजेक्शने देण्यास आम्ही सिद्ध आहोत. आम्ही केवळ रुग्णालयात सेवा देत असून देयकाविषयी रुग्णालय प्रशासनच सांगू शकेल. असे सांगून त्यांनी एकाच दिवशी ३ इंजेक्शने दिल्याचा आरोप फेटाळला.