विजयनगर (सांगली) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य राकेश श्रीपाल कुरणे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

कोरोनाबाधित असतांना रक्तदान शिबिर घेऊन वाढदिवस साजरा केल्याचे प्रकरण

  • कोरोना महामारीच्या कालावधीत स्वतः शासन नियमांचे पालन करून समाजाला पालन करण्यास सांगणारेच नियमांचे उल्लंघन करत असतील तर अशांना कठोर शिक्षा होणेच अपेक्षित आहे !
  • लोकप्रतिनिधीमुळे नागरिकांच्या जिवाला काही झाल्यास याचे दायित्व कुणाचे ?
  • इतक्या गंभीर प्रकाराला नागरिकांनी एकत्र येऊन विरोध का केला नाही ? सर्वांनी गांभीर्याने एकजूट दाखवली असती, तर हा प्रकार कदाचित् टाळता आला असता !
प्रतिकात्मक छायाचित्र

मिरज – कोरोनाबाधित असतांनाही रक्तदान शिबिर घेऊन वाढदिवस साजरा करणारे विजयनगर येथील माजी ग्रामपंचायत सदस्य राकेश श्रीपाल कुरणे यांच्यावर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात साथीरोग प्रतिबंधक कायदा, तसेच ‘महाराष्ट्र कोविड अधिनियम २०२०’ कलमाच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयी तलाठी सुधाकर कृष्णा कोंडके यांनी तक्रार दिली आहे.

कुरणे हे काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे त्यांना गृह अलगीकरणात रहाण्यासाठी सूचना दिली होती; परंतु गृह अलगीकरणात न रहाता कुरणे यांनी नातेवाईक आणि मित्रांसमवेत मोठा वाढदिवस साजरा केला. या वेळी उपस्थितांना जेवण देण्यात आले. कुरणे यांनी अनेकांना केक भरवून अलिंगन दिल्याचा धक्कादायक प्रकारही घडला. या वेळी समजावण्यासाठी गेलेल्या ग्रामदक्षता समितीलाही कुरणे यांनी अरेरावीची भाषा केल्याचे समजते. यामुळे वाढदिवसासाठी उपस्थित असणार्‍या २०० जणांचे आरोग्यही धोक्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही.