अमेरिकेतील सर्वांत मोठ्या तेल वाहिनीवर सायबर आक्रमण

अमेरिकेकडून आणीबाणीची घोषणा

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील सर्वांत मोठ्या तेल वाहिनीवर सायबर आक्रमण करण्यात आल्यानंतर प्रशासनाने आणीबाणीची घोषणा केली आहे. ज्या कोलोनियल आस्थापनावर हे आक्रमण झाले ते प्रतिदिन २५ लाख बॅरेल कच्च्या तेलाचा पुरवठा करते. येथून वाहिनीद्वारे अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर असलेल्या राज्यांमध्ये पेट्रोल, डिझेल आणि इतर गॅसचा पुरवठा होतो. आक्रमणानंतर या आस्थापनाने तिच्या काही वाहिन्या बंद केल्या आहेत. या आक्रमणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत २ – ३ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

‘डार्कसाइड’ नावाच्या सायबर गुन्हे करणार्‍या टोळीने हे सायबर आक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिने कोलोनियल आस्थापनाच्या नेटवर्कला हॅक करून १०० जीबी डेटा चोरला असून त्याच्या बदल्यात खंडणी मागितली आहे. पैसे न मिळाल्यास डेटा इंटरनेटवर उघड करण्याची धमकीदेखील दिली आहे.