चीनकडून भुतानच्या गावामध्ये घुसखोरी करून त्यावर अवैध नियंत्रण

भारताच्या विरोधात ही भूमी वापरण्याचे षड्यंत्र !

  • भारताला लागून असलेल्या देशांमध्ये अतिक्रमण करून चीन भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, हेच यातून दिसून येते !
  • तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सिक्किमला भारताशी जोडून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा चीनचा डाव उधळला होेता, हे लक्षात घेऊन भारत सरकारने आता चीनच्या विरोधात आक्रमक परराष्ट्र धोरण राबवण्याची आवश्यकता आहे !

बीजिंग (चीन) – चीन भुतानच्या ग्यालफुभ या गावामध्ये घुसखोरी करून तेथे वस्ती निर्माण करत आहे. येथे सैन्य चौकी, रस्ते आदी सुविधा निर्माण करत आहे. भारताला घेरण्यासाठी चीन हा प्रयत्न करत आहे. वर्ष २०१५ पासून चीनचा हा प्रयत्न चालू आहे. चीनने तेव्हा या भागात गाव वसवण्याची घोषणा केली होती. चीनने वर्ष १९८० पासून या गावातील २३२ चौ. मील भागावर दावा केला आहे. हा भाग भुतानच्या लुंटसे जिल्ह्यातील आहे. या गावात चीनचे अधिकारी मौजमजा करण्यास जात असतात.

तज्ञांच्या मते चीनचा उद्देश भविष्यात भारताच्या विरोधात भुतानला उभे करण्याचा आहे. जर चीनचा भारताशी संघर्ष झाला, तर भुतानच्या भूमीचा वापर करता येऊ शकतो. चीन येथील भौगोलिक स्थितीचा भारताच्या विरोधात लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहे.