कोरोना काळातही आमदार महेश शिंदे यांचे कार्य आदर्शवत् ! – शंभूराज देसाई

गुरु श्री काडसिद्धेश्‍वर स्वामी महाराज रुग्णालयाचे उद्घाटन करताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (फित कापतांना) आणि शेजारी आमदार महेश शिंदे

सातारा, ९ मे (वार्ता.) – कोरोना काळातही शिंदे कुटुंबीय तळमळीने स्वखर्चाने समाजसेवेच व्रत पार पाडत आहे. भगिनी आधुनिक वैद्या अरुणाताई बर्गे यांच्या सहयोगाने गुरु श्री काडसिद्धेश्‍वर महाराज यांच्या नावाने चालू केलेले कोविड रुग्णालय हे कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरेल. आमदार महेश शिंदे यांचे कोरोना काळातही मतदार संघातील कार्य आदर्शवत् आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री शूंभराज देसाई यांनी केले.

आमदार महेश शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि स्वखर्चातून श्री काडसिद्धेश्‍वर महाराज कोविड रुग्णालयाचे उद्घाटन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पार पडले. उद्घटनानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते. या वेळी आमदार महेश शिंदे, भगिनी आधुनिक वैद्या अरुणाताई बर्गे आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

या वेळी आमदार महेश शिंदे म्हणाले की, कुटुंबियांसमवेत कोरोनाविरुद्धची लढाई चालू केल्याचे दिसताच या लढ्याला शिलेदार मिळत गेले. कोरेगाव येथील कोरोनाविरुद्धच्या लढाईला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गुरु श्री काडसिद्धेश्‍वर महाराज कोविड रुग्णालये दोन ठिकाणी चालू करण्यात आली आहेत. यामध्ये कोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात १२२ खाटा आणि रेल्वे स्टेशनजवळील जितराज मंगल कार्यालयात १०० खाटा उपलब्ध आहेत. परदेशातून अद्ययावत् यंत्रे उपलब्ध करून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येणार असून यामुळे सहस्रो रुग्णांचे जीव वाचतील, अशी आशा आहे. माझ्यासमवेत अनेक कार्यकर्त्यांनी गावागावात रुग्णांना आवश्यक सहकार्य चालू केले आहे. तसेच गुरु श्री काडसिद्धेश्‍वर महाराज रुग्णालयातील रुग्णांनाही विनामूल्य भोजन पुरवण्यासाठी कार्यकर्ते रात्रंदिवस झटत आहेत. समाजातील अनेक दानशूर व्यक्तीही या कार्यात स्वत:ला झोकून देऊन तन, मन अन् धनाने सहभागी होत आहेत. रुग्णांसाठी फळे, चहा-न्याहरी आणि दूध आदींचेही उत्तरदायीत्व कार्यकर्ते पार पाडत आहेत.