कोरोनाच्या उपचारात देशी औषधांना प्राधान्य द्या ! – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – अत्यवस्थ कोरोनारुग्णांसाठी सध्या जीवरक्षक विदेशी औषधांना पर्यायी औषध म्हणून देशी औषधे देण्यात यावी, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला केली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपिठाने ही सूचना केली आहे.

सध्या अत्यवस्थ कोरोनारुग्णांसाठी जीवरक्षक विदेशी औषध रेमडेसिविर आणि टोसिलीझुमॅब या औषधांकडे पाहिले जात आहे; मात्र ती महागडी असल्याने त्यांचा तुटवडाही आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात टोसिलीझुमॅबला प्रभावी पर्याय औषध म्हणून इटुलिझुमॅब, डेक्समेथसॉन, मेथलप्रेडनीसलॉन ही तीन औषधे आहेत. ही औषध भारतात सिद्ध करण्यात आली आहे.

प्रभावी पर्याय असलेली देशी बनावटीची औषधे असतांना विदेशी औषधांवरील अवलंबित्व अल्प करावे. आधुनिक वैद्यांकडून रुग्णांसाठी परदेशी औषधांच्या ऐवजी ही तीन औषधे लिहून दिली जातील, या दृष्टीने वैद्यकीय क्षेत्राला प्रोत्साहन द्यावे. तसेच विदेशी औषधांविषयी नागरिकांच्या मनात असलेली चुकीची धारणा घालवण्यासाठी व्यापक प्रसिद्धीद्वारे जनप्रबोधनही करावे’, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांना केले आहे. ‘सध्याचा काळ रुग्णांवर उपचार करण्याचा आणि त्यांना दिलासा देण्याचा आहे. अत्यावश्यक जीवरक्षक औषधांच्या विक्रीतून नफेखोरी करण्याचा नाही, याविषयी संबंधितांना जाणीव करून देण्याची वेळ आली आहे’, अशी टिपणीही खंडपिठाने केली.