गृहविलगीकरणातील १०० हून अधिक कोरोनाबाधितांना प्रतिदिन २ वेळचे भोजन घरपोच करणारे शिवडी (मुंबई) येथील भालचंद्र जाधव !

श्री. भालचंद्र जाधव

मुंबई – कोरोनाच्या कालावधीत गरीब आणि हातावर पोट असलेल्या नागरिकांसाठी राज्यशासनाच्या वतीने शिवभोजन योजना विनामूल्य चालवण्यात येत आहे; पण शिवडी येथे रहाणारे श्री. भालचंद्र जाधव यांनी स्वतः कोरोनाची स्थिती अनुभवल्यानंतर गोरगरिबांसाठी स्वव्ययातून विनामूल्य भोजन चालू केले आहे. शासनावर अवलंबून न रहाता नियमित १०० हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांना ते २ वेळचे भोजन घरपोच देत आहेत.

श्री. जाधव स्वत:हून परळ, शिवडी, वडाळा या भागांत भोजनाचे डबे विनामूल्य पोचवत आहेत. त्यांचा लग्नसमारंभात भोजनव्यवस्था पुरवण्याचा (केटरिंगचा) व्यवसाय आहे. दळणवळण बंदीमुळे त्यांना व्यवसायात पुष्कळ हानी सोसावी लागूनही त्यांनी हे कार्य हाती घेतले. यात त्यांचे कुटुंबीयही त्यांना साहाय्य करतात.

स्वतःला आलेल्या प्रतिकूल अनुभवातून सर्वसामान्यांसाठी भोजनाची व्यवस्था करणे 

दैनिक सनातन प्रभातच्या प्रतिनिधीशी बोलतांना श्री. भालचंद्र जाधव म्हणाले, ‘‘लोक जेवणाचा डबा मिळाल्यानंतर हात जोडतात. ते पाहून डोळ्यांत पाणी येते. अन्य लोकांनीही आपापल्या परीने पीडितांना साहाय्य करायला हवे. कोरोनामुळे माझी पत्नी घरी विलगीकरणात होती. मी आणि माझे आई-वडील बाहेर विलगीकरण केंद्रात राहिलो. या वेळी मी जे अनुभवले, त्यावरून सामान्यजनांना भोजनासाठी किती कष्ट होत असतील ? याची जाणीव झाली. त्यानंतर मी काही रुग्णालयेही पाहिली. तेथे रस्त्यावर भोजनसेवा दिली जात होती; पण अशा रुग्णांना सात्त्विक आहाराची अत्यंत आवश्यकता होती. अनेक ठिकाणी मी हेही अनुभवले की, प्रसिद्धी मिळावी; म्हणून काही जण पुलावाचे वाटप करत होते. त्यातून रुग्णांची भूक शमेल; पण त्यांना पोषक आहार मिळणार नाही. त्यामुळे मी माझ्या परीने थोडे का होईना; पण पूर्णतः घरगुती जेवण देण्याचा प्रयत्न केला. यासाठी माझे सर्व कुटुंब मला साहाय्य करते. भोजनाची मागणी वाढल्यामुळे ‘केटरर्स’च्या सदस्यांच्या समवेत आम्ही २ वेळचे घरपोच भोजन पोचवत आहोत.’’