विमानातून रेमडेसिविर इंजेक्शन आणल्याचे प्रकरण
संभाजीनगर – नगर येथील भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी १० सहस्र रेमडेसिविर इंजेक्शन विमानातून आणल्याप्रकरणी येथील खंडपिठात प्रविष्ट केलेली याचिका न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती बी.यू. देबडवार यांनी ५ मे या दिवशी निकाली काढली. याचिकाकर्त्यांनी अन्वेषणासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक अन्वेषणासाठी त्यांना पुरवणी तक्रार अर्ज देण्याची मुभा खंडपिठाने दिली आहे.
राज्यात रेमडेसिविरचा तुटवडा असतांना खासदार सुजय विखे यांनी १० सहस्र इंजेक्शन विमानातून आणली. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे आणि दादासाहेब पवार यांनी अधिवक्ता सतीश तळेकर यांच्याद्वारे खंडपिठात याचिका प्रविष्ट केली होती. यावर ‘वस्तूस्थिती पडताळण्याचे आणि चौकशी करण्याचे काम न्यायालयाचे नसून अन्वेषण अधिकार्यांचे आहे’, असे खंडपिठाने म्हटले आहे. रुग्ण आणि नातेवाईक यांच्या वतीने अधिवक्ता सिद्धेश्वर ठोंबरे यांनी हस्तक्षेप अर्ज प्रविष्ट केला होता.