गुन्हेगारांच्या उदात्तीकरणाचा डाव !

अगोदर केवळ चित्रपट, नाटके यांच्या माध्यमांपुरते मर्यादित असणारे गुंड, गुन्हेगार आणि आर्थिक भ्रष्टाचार करणारे यांचे उदात्तीकरण ‘वेब सिरीज’च्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात होत आहे. काही मासांपूर्वी हंसल मेहता यांच्यावर आधारित ‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ ही ‘वेब सिरीज’ प्रदर्शित झाली होती. यात हर्षद मेहता याने केलेला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा दाखवला; मात्र याची मांडणी करतांना हर्षद याला एखाद्या ‘हिरोप्रमाणे’ दाखवण्यात आले. या ‘वेब सिरीज’चे विज्ञापन करतांना हर्षद मेहता याचे संवाद, ‘रिंगटोन’, तसेच सामाजिक माध्यमातून त्याचे व्यक्तीमत्त्व आकर्षक पद्धतीने बिंबवले जाईल, असेच दाखवण्यात आले. यात हर्षद मेहता पूर्वीच्या जीवनात कसा सामान्य होता आणि त्याने कोट्यवधी रुपये कसे मिळवले, हे दाखवण्यात आले आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणार्‍या आर्थिक गुन्हेगाराची प्रतिमा ‘हिरो’प्रमाणे प्रस्थापित झाली.

याच प्रकारे आता गुजरातमध्ये वर्ष १९८० च्या दशकात झालेला एक जुगारी ‘विठ्ठल तिडी’ याच्यावरही ‘वेब सिरीज’ येत असून त्यात हर्षद मेहताची भूमिका करणारा अभिनेता प्रतीक गांधी हाच तिडी याची भूमिका साकारत आहे. यातही ‘विठ्ठल तिडी’ याचा संघर्ष दाखवून तो यशस्वी जुगारी कसा होतो, हे दाखवण्यात आले आहे. काही मासांपूर्वी ‘ओव्हर द टॉप’ (ओटीटी) मंच यावर कुणाचेच कसलेही नियंत्रण नव्हते. त्यामुळे याद्वारे अश्लीलतेचा सर्रास भडिमार, सत्याचा पराकोटीचा विपर्यास, हिंदु धर्म, देवता, राष्ट्रपुरुष यांचा अवमान करणार्‍या खोट्या कथाच दाखवल्या जात आहेत. यावर हिंदुत्वनिष्ठांनी देशव्यापी आंदोलन केल्यावर फेब्रुवारी मासात केंद्र सरकारने सामाजिक माध्यमे आणि ‘ओव्हर द टॉप’(ओटीटी) मंच यांसाठी नियमावली घोषित केली. त्याची येत्या ३ मासांत कार्यवाही केली जाणार आहे. ही नियमावली करतांना आता ‘वेब सिरीज’द्वारे आर्थिक गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी यांचेही उदात्तीकरण होणार नाही, यांचाही अंतर्भाव करावा लागेल, अन्यथा समाजात अरुण गवळी, हर्षद मेहता, विठ्ठल तिडी यांच्यासारखेच आदर्श म्हणून तरुण पिढीसमोर येतील आणि समाज चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करेल !

– श्री. अजय केळकर, कोल्हापूर