प्रसारमाध्यमांना वार्तांकन करण्यास थांबवू शकत नाही !

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले !

नवी देहली – सुनावणी करत असतांना न्यायालय जी मते व्यक्त करते त्यांचे वार्तांकन करण्यापासून प्रसारमाध्यमांना रोखू शकत नाही, असे सांगत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले. मद्रास उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणुकांच्या वेळी राजकीय सभा आणि प्रसार यांच्या वेळी कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे फटकारले होते. ‘निवडणूक आयोगावर खुनाचा गुन्हा नोंदवला पाहिजे’, असे न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाचे मत प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने वरील शब्दांत न्यायालयाने माध्यमांना रोखण्यास नकार दिला.

निवडणूक आयोगाच्या वतीने बाजू मांडताना अधिवक्ता राकेश द्विवेदी म्हणाले, ‘‘न्यायालयाकडून तोंडी व्यक्त केली जाणारी मते प्रसिद्ध करण्यापासून प्रसारमाध्यमांना थांबवायला हवे. तसेच न्यायालयाच्या तोंडी मतावरून गुन्हेगारी तक्रार नोंद करू शकत नाही.’’ त्यावर न्यायालय म्हणाले, ‘‘न्यायालयात होणार्‍या चर्चेचे वार्तांकन न करण्यास माध्यमांना सांगू शकत नाही. अंतिम आदेशाप्रमाणेच न्यायालयात जी चर्चा होते, ती लोकहिताच्या दृष्टीनेच असते. न्यायालयातील चर्चा अधिवक्ता आणि न्यायाधिशांतील संवाद आहे. या प्रक्रियेच्या पावित्र्याचे संरक्षण करण्यामध्ये प्रसारमाध्यमे शक्तीशाली पहारेकरी आहेत.’’