नवीन लसीकरण केंद्रांसाठी केंद्रसरकारकडे प्रस्ताव ! – उदयनराजे भोसले

सातारा, २८ एप्रिल (वार्ता.) – केंद्रशासनाच्या वतीने १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना विनामूल्य लसीकरण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. लोकसंख्येचा विचार करता शहरातील सदरबझार, दगडी शाळा आणि शाहूपुरी ग्रामपंचायत इमारत याठिकाणी नवीन लसीकरण केंद्र चालू करण्याविषयी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायत यांच्या अधिकार क्षेत्रात नवीन लसीकरण केंद्र चालू करण्याचे जिल्हा प्रशासन आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्तावित केले आहे. लवकरच नागरिकांना सुकर होईल, अशी लसीकरणाची व्यवस्था केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली.

सातारा शहरात प्रारंभीपासूनच नगरपालिकेच्या माध्यमातून राजवाडा येथील कस्तुरबा आरोग्य केंद्र आणि गोडोली येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज आरोग्य केंद्रामध्ये शहर आणि आसपासच्या उपनगरातील नागरिकांना प्रतिदिन सरासरी ३०० व्यक्तींना लसीकरण केले जात आहे.