लाच मागितल्याच्या आरोपावरून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे अन्वेषण होणार

मुंबई – निलंबन रहित होण्यासाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी २ कोटी रुपयांची लाच मागितल्याची तक्रार निलंबित पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केली होती. या तक्रारीवरून परमबीर सिंह यांचे प्राथमिक अन्वेषण करण्याचा आदेश शासनाकडून गृहविभागाला देण्यात आला आहे. या प्रकरणी डांगे यांनी २ फेब्रुवारी २०२१ या दिवशी या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.

२० एप्रिल या दिवशी गृहविभागाकडून पोलीस महासंचालक संजय पांडे यांना परमबीर सिंह यांच्या अन्वेषणाचा आदेश देण्यात आला आहे. डांगे यांना वर्ष २०२० मध्ये निलंबित करण्यात आले होते. २ फेब्रुवारी २०२० या दिवशी त्यांचे निलंबन रहित करण्यासाठी परमबीर सिंह यांनी लाच मागितल्याची तक्रार पत्राद्वारे राज्याच्या अतिरिक्त गृहसचिवांकडे केली होती. परमबीर सिंह यांचे गुन्हे जगताशी संबंध असल्याचेही डांगे यांनी पत्रात म्हटले आहे. डांगे यांना नुकतेच पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. त्यांच्या पत्रावरून परमबीर सिंह यांचे अन्वेषण चालू करण्यात आले असून याविषयीचा अहवाल लवकरात लवकर देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.