हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःपासून करायला हवा ! – महंत संतदास महाराज, भिलवाडा

हिंदु जनजागृती समितीचे हरिद्वार येथील कुंभमेळ्यात ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’

महंत संतदास महाराज यांना समितीच्या कार्याविषयी माहिती देतांना समितीचे कार्यकर्ते

हरिद्वार – कुंभमध्ये अनेक संन्यासी असूनही त्यांना पैसा महत्त्वाचा वाटतो. देश, धर्म आणि समाज यांच्या प्रती स्वतःचे दायित्व ते विसरत आहेत. गृहस्थीही स्वतःचे दायित्व विसरून पश्‍चिमी संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत. खाणे-पिणे, वेशभूषा, आचरण या सर्वांमध्ये विकृती आली आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी स्वतःपासून प्रारंभ करण्याची आवश्यकता आहे, असे उद्गार भिलवाडा येथील महंत संतदास महाराज यांनी केले.

येथे झालेल्या कुंभमेळ्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र संपर्क अभियान’ राबवण्यात आले. या अंतर्गत विविध आखाड्याचे संत, महंत आणि महामंडलेश्‍वर यांची समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, समितीचे मध्यप्रदेश अन् राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांसह समितीचे सर्वश्री हरिकृष्ण शर्मा, राजेश उमराणी, प्रवीण वाघमारे आणि धर्मप्रेमी श्री. संजीव पुंडिर आदींनी भेट घेतली. या वेळी हिंदु राष्ट्राची स्थापना, राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात, विविध माध्यमांद्वारे होणारे देवतांचे विडंबन, लव्ह जिहाद अन् आतंकवाद, हिंदुसंघटन आदी अनेक विषयांवर समिती करत असलेल्या कार्याविषयी माहिती अवगत करून आशीर्वाद घेण्यात आले.


हिंदु जनजागृती समितीचे कार्य पाहून आनंद झाला ! – महामंडलेश्‍वर

श्री श्री १००८ श्री महंत राम भूषण दास वेदांताचार्य, वृंदावन आणि गुजरात जामनगर

आम्ही कथा आणि प्रवचने यांतून भाविकांना धर्मशिक्षण देत असतो. आमच्याकडे धार्मिक कार्यक्रम सतत चालू असतात. सर्वजण संघटित झाल्यास आनंदीआनंदच असेल. हिंदु जनजागृती समितीचे कार्य पाहून मला आनंद झाला आहे. धर्म, राष्ट्र आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांही कार्य करत आहेत. मीही कारसेवा केली आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी तुम्हाला साहाय्य हवे असल्यास ते आम्ही अवश्य करू. आमचा आशीर्वाद तुमच्यासाठी सदैव आहे. तुम्हाला भेटून पुष्कळ चांगले वाटले, असे मार्गदर्शन श्री वृंदावन नागरिक तथा संत सुरक्षा समितीचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय सौराष्ट्र विरक्त आश्रम खालसाचे प्रवर्तक महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ श्री महंत राम भूषण दास वेदांताचार्य यांनी केले.


समिती करत असलेले हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य आवश्यक !

श्री महंत सत्यगिरीजी महाराज, महामंत्री, श्री शंभू पंच दशनाम आवाहन आखाडा

श्री महंत सत्यगिरीजी महाराज यांना ‘कुंभमहिमा’ विशेषांक देतांना समितीचे श्री. आनंद जाखोटिया

सद्यःस्थितीत इतिहासात पालट केला जात आहे. मुलांना चुकीचा इतिहास शिकवला जात आहे. त्यामुळे गीतांच्या माध्यमातून युवकांना गौरवशाली इतिहासाची माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो. हिंदु राष्ट्राची स्थापना हे आवश्यक कार्य आहे. या कार्यात मी तुमच्या समवेत आहे. मला युवकांसमवेत कार्य करायला आवडते, असे प्रतिपादन श्री शंभू पंच दशनाम आवाहन आखाड्याचे महामंत्री श्री महंत सत्यगिरीजी महाराज यांनी केले.


सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य पाहून मला अतिशय चांगले वाटले ! – श्री विभूषित श्रीमद् परमहमसा आंतरराष्ट्रीय बाल संत श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी रामेश्‍वरानंद सरस्वती महाराज, हरिद्वार

श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी रामेश्‍वरानंद सरस्वती महाराज यांच्याशी चर्चा करतांना श्री. सुनील घनवट

अमाचे पंजाब, जम्मू आणि हरिद्वार येथे हिंदु धर्माचे कार्य चालू आहे. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य पाहून मला अतिशय चांगले वाटत आहे. माझे तुमच्या कार्याला आशीर्वाद आहेत, असे मार्गदर्शन येथील श्री रामेश्‍वर आश्रम ट्रस्ट कनखलमधील श्री विभूषित श्रीमद् परमहमसा आंतरराष्ट्रीय बाल संत श्री श्री १००८ महामंडलेश्‍वर स्वामी रामेश्‍वरानंद सरस्वती महाराज यांनी केले.

अन्य भेटी : मथुरा (वृंदावन) चैतन्यकुटी श्री महंत पाणी घाट येथील अखिल भारतीय चतुर संप्रदायचे आचार्य स्वामी फुलडोल बिहारी दास आणि श्री महंत दिनेशदास महाराज यांंची या वेळी भेट घेण्यात आली. त्यांनीही समितीच्या कार्याला आशीर्वाद दिले.