पणजी, २६ एप्रिल (वार्ता.) – राज्यात प्रतिदिन सहस्रोंच्या संख्येने कोरोनाबाधित नवीन रुग्ण आढळू लागल्याने राज्यातील आरोग्ययंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलेला असून ती कोलमडण्याच्या स्थितीत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या प्रतिदिन २ सहस्रांहून अधिक होत असल्याने, तसेच कोरोनाच्या चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण ४० वर पोचले आहे; म्हणजेच प्रत्येक ५ चाचण्यांच्या मागे २ कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. यामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणेवर चाचणी अहवाल वेळेत देणे, तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर निरीक्षण ठेवणे आदी मुलभूत गोष्टी करण्यासही ताण आलेला आहे. कोरोना रुग्णालयांतील खाटा भरलेल्या आहेत, तसेच दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचाराला प्रारंभ होण्यासाठी किमान ६ घंटे प्रतीक्षा करावी लागत आहे.
जिल्हाधिकार्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन योजना कार्यान्वित करण्याची आवश्यकता !
एक शासकीय डॉक्टर याविषयी अधिक माहिती देतांना म्हणाले, ‘‘लोकांना कोरोनाच्या चाचणीचा अहवाल ५ ते ७ दिवसांनी मिळत आहे.’’ ‘आय.एम्.ए.’चे माजी अध्यक्ष डॉ. अनिल मेहनडीरत्ता म्हणाले, ‘‘शासन कोरोनाच्या दुसर्या लाटेसाठी सिद्ध नव्हते. आरोग्य कर्मचार्यांवर खूप ताण आलेला आहे. आरोग्य कर्मचारीही कोरोनाबाधित होत आहेत आणि यामुळे त्यांचे मनोबलही घटत आहे.’’ आरोग्य तज्ञांच्या मते कोरोनाच्या संसर्गावर मात करण्यासमवेतच ऑक्सिजन खाटा उपलब्ध करण्यासाठी शासनाला आता युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले, ‘‘इतर खात्यातील डॉक्टरांची आरोग्य खात्यातील डॉक्टरांच्या रिक्त जागी नेमणूक करून, तसेच अतिरिक्त परिचारिका कंत्राटी पद्धतीवर घेऊन मनुष्यबळाचा तुटवडा दूर करण्यात येणार आहे.’’ एका वरिष्ठ आरोग्य अधिकार्याच्या मते आता जिल्हाधिकार्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन योजना कार्यान्वित केली पाहिजे. यामुळे ‘आय.एम्.ए.’चे सर्व डॉक्टर, सेना आणि नौसेना यांचे डॉक्टर एकत्र येऊन स्थिती नियंत्रणात आणण्यास साहाय्य होईल.
कोरोनाबाधित रुग्णांसाठी गृहअलगीकरण ही सुविधा निकामी ठरण्याच्या स्थितीत
कोरोनाबाधित रुग्णांसाठी गृहअलगीकरण ही सुविधा निकामी ठरण्याच्या स्थितीत आहे, असे मत एका वरिष्ठ शासकीय डॉक्टराचे म्हणणे आहे. २५ एप्रिल या दिवशी २५ वर्षीय कोरोनाबाधित युवकाचा मृत्यू झाला. हा युवक गेले १० दिवस घरी अलगीकरणात होता आणि त्याला अन्य कोणतीही व्याधी नव्हती. या युवकाला अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचार चालू झाल्यावर अर्ध्या घंट्याने त्याचे निधन झाले. २५ एप्रिल या दिवशी सुमारे ७ रुग्णांचे रुग्णालयात भरती केल्यानंतर २४ घंट्यांच्या आत निधन झाले. कोरोनाबाधित झाल्याने घरी अलगीकरणात असलेले मडगाव नगरपालिकेचे उमेदवार आर्थर डिसिल्वा यांना २३ एप्रिलला प्रचार करतांना पकडले होते. त्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंद झालेला आहे. अशा प्रकारे गृहअलगीकरणात असलेले रुग्ण दायित्वशून्यतेने वागत आहेत.