श्रीरामाचा ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजप ऐकल्याने व्यक्तीवर होणारा परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

नामजपाविषयी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

​‘देवतेची ‘तारक’ आणि ‘मारक’ अशी दोन रूपे असतात. भक्ताला आशीर्वाद देणारे देवतेचे रूप म्हणजे तारक रूप, उदा. आशीर्वाद देतांनाच्या मुद्रेतील श्रीकृष्ण. देवतेचे असुरांचा संहार करणारे रूप म्हणजे मारक रूप, उदा. शिशुपालावर सुदर्शनचक्र सोडणारा श्रीकृष्ण. देवतेच्या तारक किंवा मारक रूपाशी संबंधित नामजप म्हणजे ‘तारक’ किंवा ‘मारक’ नामजप. देवतेप्रती सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी, तसेच चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या अनुभूती लवकर येण्यासाठी अन् वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी देवतेच्या ‘तारक’ रूपाचा नामजप आवश्यक असतो. देवतेकडून शक्ती अन् चैतन्य ग्रहण होण्यासाठी आणि वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी देवतेच्या ‘मारक’ रूपाचा नामजप आवश्यक असतो. कोणतीही गोष्ट काळानुसार केली, तर तिचा अधिक लाभ होतो. यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका कु. तेजल पात्रीकर (संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय) यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक प्रयोग केले आहेत. त्यांतून हे नामजप सिद्ध झाले आहेत.

​‘श्रीरामाचा ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजप मंद, मध्यम किंवा मोठ्या आवाजात ऐकल्याने व्यक्तीवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

या चाचणीतील प्रयोगांत आध्यात्मिक त्रास असलेली आणि नसलेली साधिका यांना श्रीरामाचा ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजप मंद, मध्यम आणि मोठ्या आवाजात प्रत्येकी १ घंटा ऐकवण्यात आला. प्रत्येक प्रयोगापूर्वी आणि प्रयोगानंतर साधिकांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे मोजण्या करण्यात आल्या. श्रीरामाचा ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजप ऐकल्याने चाचणीतील साधिकांवर झालेले परिणाम येथे दिले आहेत.

१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्‍लेषण – श्रीरामाचा ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजप ऐेकल्याने चाचणीतील साधिकांवर झालेले सकारात्मक परिणाम

१ अ १. श्रीरामाच्या ‘तारक’ नामजपाचा प्रयोग


१ अ २. श्रीरामाच्या ‘मारक’ नामजपाचा प्रयोग

टीप – ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजांनी ९० अंशाचा कोन केला. ‘ऑरा स्कॅनर’च्या भुजांनी १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.

२. निष्कर्ष

सौ. मधुरा कर्वे

वरील दोन्ही सारण्यांच्या तुलनात्मक अभ्यासातून पुढील निष्कर्ष लक्षात येतात.

१. प्रयोगांतील सर्वच नामजप (मंद, मध्यम आणि मोठ्या आवाजातील श्रीरामाचा ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजप ) ऐकल्याने चाचणीतील दोन्हीही साधिकांवर सकारात्मक परिणाम झाले; पण त्यांचे प्रमाण निरनिराळे आहे.

२. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या
साधिकेवर ‘तारक’पेक्षा ‘मारक’ नामजपाचा अधिक सकारात्मक आणि मोठ्या आवाजातील ‘मारक’ नामजप ऐकल्याने सर्वाधिक सकारात्मक परिणाम झाला.

३. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकेवर ‘मारक’पेक्षा ‘तारक’ नामजपाचा अधिक सकारात्मक परिणाम होण्यासह तिच्यावर मंद आवाजातील ‘तारक’ नामजप ऐकल्याने सर्वाधिक सकारात्मक परिणाम झाला.

३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

३ अ. श्रीरामाचा ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजप यांतून प्रक्षेपित झालेले चैतन्य ग्रहण केल्याने चाचणीतील दोन्ही साधिकांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे : चाचणीतील पहिल्या साधिकेला वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे. प्रयोगांच्या आरंभी तिच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात आढळल्या. (‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा व्यक्ती भोवतीचे त्रासदायक आवरणे, तर ‘अल्ट्राव्हायोलेट’ ही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्तींनी व्यक्तीच्या देहात साठवलेली त्रासदायक शक्ती दर्शवते.) या साधिकेला वाईट शक्तींचा तीव्र त्रास असूनही तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जाही होती. या साधिकेने श्रीरामाचा ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजप यांतून प्रक्षेपित झालेले चैतन्य सूक्ष्मातून ग्रहण केल्याने तिच्यातील नकारात्मक ऊर्जा पुष्कळ न्यून झाली किंवा नाहीशी झाली आणि तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.
​चाचणीतील दुसर्‍या साधिकेला आध्यात्मिक त्रास नाही. तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा होती. साधिकेने श्रीरामाचा ‘तारक’ आणि ‘मारक’ नामजप यांतून प्रक्षेपित झालेले चैतन्य सूक्ष्मातून  ग्रहण केल्याने तिच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली.

३ आ. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेला मोठ्या आवाजातील ‘मारक’ नामजप ऐकल्याने सर्वाधिक लाभ होणे : देवतेच्या मारक नामजपातून देवतेच्या शक्तीची स्पंदने व्यक्तीला मिळतात. मंद आवाजातील नामजप सत्त्वप्रधान, मध्यम आवाजातील नामजप सत्त्व-रजप्रधान, तर मोठ्या आवाजातील नामजप रज-सत्त्वप्रधान आहे. व्यक्तीला असलेल्या वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणार्थ तिने मारक नामजप मोठ्याने ऐकणे किंवा करणे लाभदायी आहे. मोठ्याने नामजप केल्याने देवतेच्या सगुण शक्तीची स्पंदने व्यक्तीला मिळाल्याने तिच्यातील नकारात्मक स्पंदने अल्पावधीत न्यून किंवा नष्ट होतात, तसेच तिच्यातील सकारात्मक स्पंदनांमध्ये वाढ होते. त्यामुळे व्यक्तीला असलेला आध्यात्मिक त्रास उणावतो. चाचणीतील तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेला वाईट शक्तींचा तीव्र त्रास आहे. तिच्यावर मोठ्या आवाजातील ‘मारक’ नामजपातून प्रक्षेपित झालेल्या सगुण-निर्गुण स्पंदनांचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.

३ इ. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकेला मंद आवाजातील ‘तारक’ नामजप ऐकल्याने सर्वाधिक लाभ होणे :
मंद आवाजातील नामजप निर्गुणाकडे जाणारा असल्याने त्यामध्ये निर्गुण तत्त्व अधिक असते. याउलट मोठ्या आवाजातील नामजपामध्ये सगुण तत्त्व अधिक असते. आध्यात्मिक त्रास नसलेल्या साधिकेला वाईट शक्तींचा त्रास नाही. साधिकेला ‘तारक’ नामजपातील निर्गुण तत्त्वाची आवश्यकता असल्याने तिच्यावर मंद आवाजातील ‘तारक’ नामजपाचा सर्वाधिक सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले.
​थोडक्यात व्यक्तीची प्रकृती, तिला असलेला आध्यात्मिक त्रास, तिच्या त्रासाचे प्रमाण अन् तीव्रता, तिची आध्यात्मिक पातळी, तिच्यातील भाव इत्यादी घटकांनुसार तिला त्या त्या वेळी तो तो नामजप ऐकल्याने किंवा केल्याने आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतात. चाचणीतील दोन्ही साधिकांना त्यांची प्रकृती आणि आवश्यकता यांनुसार नामजपातून ते ते देवतातत्त्व मिळाले.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा नामजपांमागे असलेला संकल्प

जगभरातील साधकांचे आध्यात्मिक त्रास लवकर दूर व्हावेत, तसेच त्यांना देवतांच्या तत्त्वांचा अधिकाधिक लाभ व्हावा, यांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार देवतांचे नामजप ध्वनीमुद्रित केले आहेत. देवतांचे नामजप ध्वनीमुद्रित करण्यामध्ये त्यांचा अप्रत्यक्ष संकल्पच कार्यरत झाला असल्याने या नामजपांनुसार साधकांनी नामजप केल्यास त्यांचे त्रास दूर होण्यास, तसेच त्यांना देवतांच्या तत्त्वांचा लाभ होण्यास निश्‍चितच साहाय्य होईल.

५. सर्वसाधारण व्यक्तीने कोणता नामजप ऐकावा किंवा करावा ?

​सदर लेख वाचून काही जणांना प्रश्‍न पडू शकतो – ‘मला आध्यात्मिक त्रास आहे का ? माझ्यासाठी कोणता नामजप ऐकणे किंवा करणे लाभदायी आहे ?’
उत्तर : आजकाल बहुतेकांना अल्प-अधिक प्रमाणात आध्यात्मिक त्रास असतोच. ‘स्वतःच्या प्रकृतीनुसार देवतेचा ‘तारक’ किंवा ‘मारक’ नामजप करणे महत्त्वाचे आहे. स्वतःच्या प्रकृतीनुसार देवतेचा तारक किंवा मारक नामजप केल्यास व्यक्तीला देवतेच्या तत्त्वाचा अधिक प्रमाणात लाभ होतो. यामुळे त्या त्या देवतेचे तारक आणि मारक असे दोन्ही नामजप काही वेळ करून पहावेत किंवा ऐकावेत आणि ‘ज्या नामजपामध्ये मन अधिक रमते’, तो नामजप करावा किंवा ऐकावा. एखादी व्यक्ती नियमित नामजप किंवा साधना करत नसेल, तिनेही तारक आणि मारक असे दोन्ही नामजप काही वेळ करून पहावेत आणि जो नामजप आवडेल तो करावा.’ (संदर्भ – www.sanatan.org/mr/a/75575.html)’- सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (७.४.२०२१)
ई-मेल : [email protected]