‘निर्विचार’ या नामजपाचा व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम होणे !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ आणि ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ या उपकरणांद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ हे उपकरण हाताळतांना श्री. आशिष सावंत आणि समवेत अन्य

१. ‘निर्विचार’ या नामजपाचे महत्त्व

महर्षी

‘मन जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत मनोलय होत नाही. मन निर्विचार करण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन, भावजागृती इत्यादी उपाय कितीही काळ केले, तरी मन कार्यरत असते. तसेच एखाद्या देवतेचा नामजप अखंड केला, तरी मन कार्यरत असते आणि मनात देवाच्या आठवणी, भाव इत्यादी येतात. याउलट ‘निर्विचार’ हा नामजप अखंड केला, तर मनाला दुसरे काहीच आठवत नाही. याचे कारण म्हणजे अध्यात्मातील ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या नियमानुसार या नामजपामुळे मन त्या शब्दाशी एकरूप होऊन निर्विचार होते, म्हणजे प्रथम मनोलय, नंतर बुद्धीलय, त्यानंतर चित्तलय आणि शेवटी अहंलय होतो. त्यामुळे निर्गुण स्थितीत लवकर जाण्यास साहाय्य होते.’ (संदर्भ : https://www.sanatan.org/mr/a/79145.html)

२. चाचण्यांतील नोंदींचे विवेचन

‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करताना श्री. आशिष सावंत

‘निर्विचार’ या नामजपाचा व्यक्तीची सूक्ष्म-ऊर्जा आणि तिची कुंडलिनी चक्रे यांच्यावर काय परिणाम होतो ?’, हे अभ्यासण्यासाठी काही चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांसाठी ‘यू.ए.एस्.’ आणि ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ (टीप) या उपकरणांचा उपयोग करण्यात आला. ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे व्यक्ती, वस्तू आणि वास्तू यांच्यातील सकारात्मक अन् नकारात्मक ऊर्जा मोजता येते. ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ या उपकरणाद्वारे व्यक्तीचे ऊर्जा क्षेत्र (Energy Field) आणि तिची कुंडलिनी चक्रे यांची स्थिती अभ्यासता येते.

या प्रयोगात एका व्यक्तीला ‘निर्विचार’ हा नामजप १० मिनिटे ऐकवण्यात आला. व्यक्तीला नामजप ऐकवण्यापूर्वी आणि नामजप ऐकवल्यानंतर तिच्या ‘यू.ए.एस्.’ आणि ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ (टीप) या उपकरणांद्वारे चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील नोंदींचे विवेचन पुढे दिले आहे.

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

टीप : ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ या उपकरणाची माहिती : रशियातील डॉ. कॉन्स्टनटीन कोरोटकोव्ह यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायजेशन’ या तंत्रज्ञानावर आधारित ‘बायो-वेल’ हे उपकरण बनवले आहे. व्यक्तीच्या ऊर्जेचे परीक्षण करण्यास उपयुक्त असा एक छायाचित्रक (कॅमेरा) आणि संगणकीय प्रणाली यात वापरली आहे. या उपकरणाद्वारे परीक्षण करतांना व्यक्तीच्या हाताच्या प्रत्येक बोटाला एक वेदनारहित हलकासा विद्युत् झटका सेकंदापेक्षाही अल्प कालावधीसाठी दिला जातो. त्यामुळे व्यक्तीच्या त्वचेतून ‘फोटॉन’ आणि ‘इलेक्ट्रॉन’ या अतीसूक्ष्म कणांच्या होणार्‍या प्रक्षेपणास चालना मिळते. प्रत्येक बोटातून होणार्‍या ‘फोटॉन’ कणांच्या प्रक्षेपणाची छायाचित्रे ‘बायो-वेल जी.डी.व्ही. (Bio-well GDV)’ या उपकरणातील छायाचित्रकाद्वारे टिपली जातात आणि त्याच्या आधारे संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने व्यक्तीचे ऊर्जाक्षेत्र आणि तिची कुंडलिनी चक्रे यांची माहिती मिळते.

२ अ. व्यक्तीच्या ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे केलेल्या नोंदी : व्यक्तीला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकवल्यावर तिच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन तिच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. हे पुढे दिलेल्या नोंदींतून लक्षात येते.

२ आ. व्यक्तीच्या ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ या उपकरणाद्वारे केलेल्या नोंदी 

२ आ १. तणाव आणि ऊर्जा यांचे एकूण प्रमाण : व्यक्तीला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकवल्यानंतर तिचा तणाव (stress level) सामान्य (normal) असल्याचे, तसेच तिच्यातील ऊर्जा (energy) वाढल्याचे दिसून आले. या नोंदी पुढे दिल्या आहेत.

टीप १ : ‘बायो-वेल जी.डी.व्ही.’ संगणकीय प्रणालीद्वारे मिळालेल्या अहवालात तणाव ० ते १० अंकांच्या मोजपट्टीवर दर्शवला आहे; पण त्याचे कोणतेही एकक दिलेले नाही. सामान्य तणाव हा ‘२ ते ४ एकक’ या मर्यादेत असतो.

टीप २ : ‘ज्यूल’ हे ऊर्जामापनाचे एकक आहे. ऊर्जा म्हणजे कोणताही भौतिक पालट घडवण्याची किंवा कार्य करण्याची क्षमता होय. एक ज्यूल म्हणजे सर्वसाधारणपणे १०० ग्रॅम वजनाचे एक सफरचंद हवेमध्ये एक मीटर उंच उचलण्यासाठी लागणारी ऊर्जा किंवा एक वॅटचा (एल्.इ.डी.) दिवा १ सेकंद पेटवण्यासाठी लागणारी वीज होय.’ (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Joule, https://mr.wikipedia.org/wiki/ज्यूल, https://mr.wikipedia.org/wiki/ऊर्जा )

२ आ २. व्यक्तीच्या कुंडलिनी चक्रांची स्थिती : व्यक्तीला ‘निर्विचार’ हा नामजप ऐकवल्यावर तिच्या ७ पैकी ५ चक्रांची ऊर्जा वाढली. तिच्या चक्रांची सरासरी ऊर्जा ४.८ ज्यूलवरून ५.१ ज्यूलपर्यंत वाढली. हे पुढे दिलेल्या नोंदींतून लक्षात येते. हा चांगला परिणाम आहे.

टीप : प्रत्येक कुंडलिनी चक्राची ऊर्जा (energy) ५.० ज्यूल असणे उत्तम असते. पुढील सारणीत सर्वत्र ‘ज्यूल’ असे दिले आहे. त्याला ‘सेंटीज्यूल’ म्हणतात. एक सेंटीज्यूल म्हणजे ‘०.०१ ज्यूल’ (एक ज्यूलचा शंभरावा भाग) होय.

३. दोन्ही चाचण्यांचे निष्कर्ष

‘निर्विचार’ या नामजपाचा व्यक्तीवर सकारात्मक परिणाम दिसून येणे : ‘निर्विचार’ या नामजपातून चाचणीतील व्यक्तीला निर्गुण स्तरावरील चैतन्य मिळाले. तिच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढली, तसेच तिचे ऊर्जा क्षेत्र आणि कुंडलिनी चक्रे यांच्यावर सकारात्मक परिणाम झाले.

४. ‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना व्यक्तीला जाणवलेली सूत्रे आणि त्यांचे विश्लेषण 

सौ. मधुरा कर्वे

अ. प्रयोगाच्या आरंभी व्यक्तीला तिच्या आज्ञाचक्रावर दाब जाणवला.

विश्लेषण : तिच्या आज्ञाचक्रावर त्रासदायक स्पंदनांचे आवरण असल्याने तिला तसे जाणवले.

आ. काही वेळाने तिला अनाहत चक्रावर स्पंदने जाणवली.

विश्लेषण : नामजपातील चैतन्याचा सकारात्मक परिणाम तिच्या अनाहत चक्रावर होऊ लागल्याने तिला अनाहत चक्रावर स्पंदने जाणवली.

इ. त्यानंतर तिला ‘विशुद्ध चक्रावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय (टीप) होत आहेत’, असे जाणवले. तसेच तिला ढेकर आली.

विश्लेषण : नामजपातील चैतन्यामुळे तिच्या विशुद्ध चक्रावरील त्रासदायक स्पंदने नष्ट होऊ लागली. तिच्या शरिरातील त्रासदायक (काळी) शक्ती ढेकरांच्या माध्यमातून बाहेर पडली.

टीप : आध्यात्मिक स्तरावरील उपाय : आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी करायच्या उपायांना ‘आध्यात्मिक स्तरावरील उपाय’ असे म्हणतात. या उपायांमुळे व्यक्तीच्या शरिरातील त्रासदायक (काळी) शक्ती काही वेळा ढेकरा, जांभया इत्यादी माध्यमांतून शरिराबाहेर पडते. विभूती लावणे, नामजप करणे, दृष्ट काढणे इत्यादी कृतींमुळे आध्यात्मिक त्रास दूर होण्यास साहाय्य होते.

ई. ‘निर्विचार’ हा नामजप ऐकल्यानंतर (प्रयोगानंतर) व्यक्तीला हलकेपणा जाणवला.

विश्लेषण : ‘निर्विचार’ या नामजपातील निर्गुण चैतन्य ग्रहण केल्याचा हा सुपरिणाम आहे.

या प्रातिनिधिक प्रयोगातील चाचण्यांचे निष्कर्ष, चाचणीतील व्यक्तीला जाणवलेली सूत्रे आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण यांतून ‘निर्विचार’ या नामजपातून प्रक्षेपित होणार्‍या निर्गुण चैतन्यामुळे व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम होतात’, हे स्पष्ट झाले.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.९.२०२४)

‘निर्विचार’ हा नामजप कुणी करावा ? किती वेळ करावा ? इत्यादी सूत्रे पुढील ‘लिंक’वर दिली आहेत. https://www.sanatan.org/mr/a/79145.html

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक