कोरोना प्रतिबंधक लसीचा कोल्हापुरात तुटवडा : ज्येष्ठ नागरिकांची परवड !

नियोजनशून्य कारभाराचे उदाहरण ! आपत्काळात अशाप्रकारे कार्य करणारे प्रशासन संपतकाळात जनतेची कामे काय करत असतील, असा विचार कुणाच्याही मनात आल्यास चूक ते काय ? अशाप्रकारे दायीत्वशून्यपणे काम करणार्‍या संबंधितांंना शिक्षाच द्यायला हवी.


कोल्हापूर – एकीकडे शासन नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी उद्युक्त करत आहे, विविध माध्यमांतून विज्ञापन देत आहे आणि प्रत्यक्षात मात्र लसीचा तुटवडा आहे, अशी स्थिती आहे. यामुळे विशेषकरून ज्येष्ठ नागरिकांची चांगलीच परवड होतांना दिसत आहे. शहरातील अनेक केंद्रांवर लस संपल्याचे फलक लागले आहेत. अनेक केंद्रांवर २ दिवसांनी लस उपलब्ध होईल, असे सांगितले जात आहे. आरोग्य केंद्राच्या मागणीनुसार अथवा नागरिकांच्या मागणीनुसार लस उपलब्ध नसल्याने ही अडचण येत आहे.

२३ एप्रिलला ज्या केंद्रावर लस उपलब्ध होती त्या केंद्रावर नागरिकांच्या लांब-लचक रांगा लागलेल्या दिसून आल्या. यामुळे अनेक ठिकाणी सामाजिक अंतराचा फज्जा उडालेला दिसून आला. १५० ते २०० च्या संख्येने डोस केंद्रावर येतात आणि ते घेण्यासाठी ५०० ते ६०० नागरिक केंद्रावर असतात. त्यामुळे जवळपास ४०० हून अधिक नागरिकांना परत जावे लागत आहे. आलेल्या नागरिकांना लस संपल्याची कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना या केंद्रावरून त्या केंद्रावर फिरावे लागते. ग्रामीण भागातही हेच चित्र असून अनेक आरोग्य केंद्रावर लस कधी उपलब्ध होणार याची निश्‍चित माहिती नसल्याने लोक त्रस्त आहेत.