राज्यात दळणवळण बंदी घोषित करण्याऐवजी निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दळणवळण बंदी घोषित करण्याऐवजी ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेच्या अंतर्गत राज्यशासन कोरोनाविषयक निर्बंध अधिक कडक करण्याची शक्यता आहे. राज्यात दळणवळण बंदी लागू करण्याविषयीचे धोरण निश्‍चित करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २१ एप्रिल या दिवशी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना राज्यात दळणवळण बंदी घोषित करण्याऐवजी निर्बंध अधिक कडक करण्यात येतील, असे सांगितले.

ही बैठक दुपारी संपली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील दळणवळण बंदीविषयीची भूमिका घोषित करतील, अशी शक्यता होती; मात्र सायंकाळी उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांनी याविषयीची भूमिका घोषित केलेली नाही. त्यामुळे शासनाकडून रात्री उशिरापर्यंत कोरोनाविषयक निर्बंध प्रसारित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलतांना राजेश टोपे म्हणाले, ‘‘ब्रेक दि चेन’ मोहिमेद्वारे कोरोनाची साखळी तोडण्यात येईल. मंत्रीमंडळाच्या बैठकीत उपस्थित सर्वांनी कडक दळणवळण बंदीची मागणी केली असली, तरी आता राज्यात ‘दळणवळण बंदी’ असे शब्दप्रयोग करण्यात आला नाही, तरी कठोर निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.’’