मुंबईची स्थिती अतिशय वाईट असून आधुनिक वैद्यही बिथरले आहेत ! – डॉ. तृप्ती गिलाड, संसर्गरोगतज्ञ, मुंबई 

मुंबई – आम्ही अतिशय हतबल आहोत. अन्य डॉक्टरांप्रमाणे मीसुद्धा घाबरले आहे. आम्हाला अनेक रुग्णांना घरीच उपचार द्यावे लागत आहेत. काय करावे, ते समजत नाही. मुंबईची स्थिती अतिशय वाईट आहे. मला इतके हतबल आणि लाचार कधीच झाल्यासारखे वाटले नाही. कोरोनाची स्थिती इतकी भयंकर झाली आहे की, आता आधुनिक वैद्यही बिथरले आहेत, अशा शब्दांत मुंबईतील संसर्गरोगतज्ञ डॉ. तृप्ती गिलाड यांनी कोरोनामुळे मुंबईमध्ये वैद्यकीय क्षेत्रात निर्माण झालेल्या स्थितीचे वर्णन एका व्हिडिओद्वारे केले. हा व्हिडिओ त्यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये बोलतांना त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

या व्हिडिओमध्ये डॉ. तृप्ती गिलाड यांनी म्हटले आहे, ‘‘नियमित वाढणारी रुग्णांची संख्या, खाटांची कमतरता, लस आणि ‘रेमडेसिविर’ यांचा तुटवडा यांमुळे परिस्थिती भयंकर झाली आहे. तुम्हाला वाटते की, तुम्हाला वर्षभर कोरोना झाला नाही, म्हणजे तुम्ही ‘सुपरहिरो’ आहात. तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, तर असे मुळीच नाही. आम्ही अनेक तरुणांना पहात आहोत. अगदी ३५ वर्षे वयातील लोकही ‘व्हेन्टिलेटर’वर आहेत. जगण्यासाठी धडपडत आहेत. तुम्हाला ताप आला, तर घाबरून जाऊ नका. त्वरित रुग्णालयात भरती होऊ नका. घाबरून अनेक लोक रुग्णालयात भरती होत आहेत. त्यामुळे ज्यांना खरोखरच आवश्यक आहे, त्यांना खाटा मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना घरीच ऑक्सिजन देऊन उपचार करावे लागत आहेत. कोरोना तुमच्या आजूबाजूला सर्वत्र आहे. तुम्ही घराबाहेर पडाल, तेव्हा तुम्ही ‘मास्क’ घालायलाच हवा.’’