रायगड, १९ एप्रिल (वार्ता.) – पनवेल नगरपालिकेच्या वतीने १९ एप्रिल या दिवशी नवीन पनवेल येथील बांठीया शाळेच्या बाजूला ४५ वर्षांच्या वरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र (‘यूपीएच्सी ३’ न्यू पनवेल आरोग्य केंद्र) उभारण्यात आले होते. लसीकरणाची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली; मात्र केवळ १०० जणांना लस देण्यात येणार असल्याचे आयत्यावेळी सांगितल्यामुळे सकाळपासून रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांचा संताप अनावर झाला. नागरिकांनी कर्मचार्यांशी वाद घालायला प्रारंभ केल्यामुळे लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ उडाला. या सर्व प्रकारामध्ये लसीकरण केंद्राच्या ठिकाणी सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचा पुरता बट्टयाबोळ उडाला.
लसीकरण केंद्रावर सकाळी ९.४५ वाजता लसीकरणाला प्रारंभ झाला. लस कोणत्या वेळेत आणि किती जणांना देण्यात येणार याविषयी कोणतीच सूचना लसीकरण केंद्राच्या ठिकाणी लावण्यात आलेली नव्हती, तसेच ‘ऑनलाईन’ नोंदणी केलेल्या नागरिकांच्या लसीकरणाविषयी कर्मचारी अनभिज्ञ होते. ‘रांगेत असलेल्या सर्वांना लस मिळेल’, या विचाराने नागरिक अनेक वेळ रांगेत उभे होते; मात्र अचानकपणे लसीकरण केंद्रातील कर्मचार्यांनी प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या ५० आणि ‘ऑनलाईन’ नोंदणी केलेल्या ५० जणांना लस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अनेक ज्येष्ठ नागरिक १ घंट्याहून अधिक वेळ रांगेत उभे राहिले होते. ‘ऑनलाईन’ नोंदणी केलेल्या नागरिकांसाठी वेगळ्या रांगेचीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे ‘ऑनलाईन’ नोंदणी केलेले कोण आहेत ? हे कळत नव्हते, तसेच कर्मचार्यांनाही ‘ऑनलाईन’ नोंदणी केलेल्या नागरिकांची नावे कशी पहावी ? याविषयीही उपस्थित कर्मचार्यांना माहिती नव्हती. त्यामुळे ‘ऑनलाईन’ नोंदणी झालेल्यांना लसीकरण करण्याच्या नियोजनाचाही पुरता बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून आले.