कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे भारतात आणि विशेषकरून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परत एकदा नागरिकांना विविध स्वरूपाच्या कठीण संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे अक्षरशः हाल होत आहेत. याला प्रशासन आणि नागरिक यांच्या चुका, भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, नियोजनाचा अभाव यांमुळे विलंबाने अन् अपुर्या प्रमाणात मिळणारे वैद्यकीय उपचार, औषधांचा तुटवडा, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मिळणारी अयोग्य वागणूक आदी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आता आपत्काळाची दाहक झळ बसत आहे. या महामारीच्या संकटाशी लढतांना नागरिकांना कोणत्या समस्या आणि अडचणी यांना सामोरे जावे लागत आहे, याची भयावहता लक्षात यावी, यासाठी हे सदर चालू करत आहोत. यातून वाचकांनाही आपत्काळाची भीषणता लक्षात येऊन काय सावधानता बाळगायला हवी, हे लक्षात येईल.
‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवेल !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पुणे येथील ससून रुग्णालयात एका खाटेवर ३ रुग्णांना उपचार
पुणे – पुणे येथे दिवसेंदिवस वाढत जाणार्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे विदारक स्थिती निर्माण झाल्याने एका खाटेवर २ किंवा ३ रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. याचा आरोग्ययंत्रणेवर ताण येत आहे. ससून रुग्णालयातील या स्थितीचा एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने कोरोनाबाधित वाढत्या रुग्णसंख्येची भीषणता लक्षात येत आहे. काही रुग्ण भूमीवर पडून आहेत. या रुग्णालयाची नवीन इमारत बांधून सिद्ध असूनही सुविधांअभावी त्या ठिकाणी उपचार चालू नाहीत.
अपुर्या मनुष्यबळाअभावी येथील आधुनिक वैद्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथे आधुनिक वैद्यांच्या अलगीकरणासाठी सुविधा नाहीत. गेल्या काही मासांपासून आवश्यक उपाययोजनांची व्यवस्था करण्याची विनंती करूनही अद्याप शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
बीड येथे रेमडेसिवीर इंजेक्शनची ५ सहस्र ४०० रुपयांना विक्री !
मरणासन्न रुग्णांची अडवणूक करणारे भ्रष्ट औषधविक्रेते !
बीड – येथील लाईफ लाईन रुग्णालयाशी संलग्न मेडिकलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार चालू असल्याचे उघड झाले आहे. या मेडिकलमध्ये एका इंजेक्शनसाठी ५ सहस्र ४०० रुपये मूल्य आकारण्यात येत आहे. या मूल्याने २ इंजेक्शनची विक्री केल्याचे नुकतेच समोर आले आहे. या प्रकरणी इंजेक्शन खरेदी करणारे संतोष सोहनी यांनी शहर पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई होईल’, असे शहर पोलिसांनी सांगितले.
बारामती येथे बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणार्या ४ जणांना अटक
बारामती (जिल्हा पुणे) – येथे बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणार्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटेमॉलचे औषध भरून हे आरोपी रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणून विक्री करत होते. या बनावट इंजेक्शनची विक्री ही प्रत्येकी ३५ सहस्र रुपयांना केली जात होती. एका रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शनाची आवश्यकता होती. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाइकाने पोलिसांच्या साहाय्याने या आरोपींतील एकाशी संपर्क साधला. हा आरोपी ३५ सहस्र रुपयांना एक अशी मिळून ७० सहस्र रुपयांची दोन इंजेक्शन नातेवाईकाला विकत असतांना बारामती तालुका पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली.
या आरोपींची अधिक चौकशी केली असता आणखी दोन आरोपींचा पोलिसांना शोध लागला. त्यामुळे प्रशांत घरत, शंकर भिसे, दिलीप गायकवाड आणि संदीप गायकवाड या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या आरोपींसह गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे
सातारा जिल्ह्यात मृत्यूदर वाढल्याने कैलास स्मशानभूमीवर ताण !
सातारा, १८ एप्रिल (वार्ता.) – जिल्ह्यात कोरोनाबाधितांवर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. तेथे २० ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येतात. १० ठिकाणे कोरोनाच्या मृतदेहांसाठी, तर १० ठिकाणे सामान्य मृतदेहांसाठी उपयोगात आणली जात आहेत. आता जिल्ह्यातील मृत्यूदर वाढल्यामुळे स्मशानभूमीवर अतिरिक्त ताण आला आहे.
कैलास स्मशानभूमीविषयी माहिती सांगताना बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे म्हणाले की, एका मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी किमान ३ घंटे अवधी लागतो. नंतर इतर विधीसाठी ५ घंटे अग्निकुंड तसा ठेवावा लागतो. त्यानंतर दुसर्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रक्रिया करण्यात येते. स्मशानभूमीत कितीही गडबड असली, तरी मृतदेहांची कोणतीही विटंबना होऊ नये, यासाठी विधीवत पद्धतीने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची काळजी घेतली जात आहे.
खाट मिळत नसल्याने कोरोनाबाधित महिलेची आत्महत्या !
पुणे – खाट मिळत नसल्याने येथील वारजे भागातील कोरोनाबाधित महिलेने गळफास लावून आत्महत्या केली. या कोरोनाबाधित महिलेला कुठल्याही रुग्णालयात खाट मिळाली नाही. त्यामुळे तिला पुष्कळ नैराश्य आले होते. महिलेने आत्महत्येपूर्वी चिठ्ठीत ‘मी आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे’, असे लिहिले होते.
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन साधक, वाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी आणि विज्ञापनदाते यांनी त्यांना किंवा परिचितांना येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत. आरोग्य साहाय्य समितीपत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : [email protected] |